ज्या रोगांत रोगास कारणीभूत सूक्ष्मजीवांचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होतो, अशा रोगांस संसर्गजन्य रोग म्हणतात. असे रोग निसर्गत: जसे पसरतात, तसेच ते युद्धात किंवा विध्वंसक संघटनांकडून पसरवलेही जाऊ शकतात. जैविक साधनांचा, प्रामुख्याने सूक्ष्मजीवांचा अस्त्र म्हणून वापर करून दहशत निर्माण करण्याच्या युद्ध प्रकाराला जैविक युद्ध म्हटले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन काळी देखील शहरांच्या भिंतींवर किंवा विहिरींत आणि इतर जलस्रोतांत शत्रू राष्ट्रास नामोहरम करण्यासाठी रोगाने संक्रमित मृतदेह टाकण्यात आल्याचे उल्लेख आढळतात. ‘ग्लॅडिएटर्स’ कधी कधी रिंगणात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या तलवारी कुजलेल्या प्रेतात रुतवून दूषित करत. कुजलेल्या प्रेतातील घातक सूक्ष्मजीवांच्या संसर्गामुळे तलवारीच्या अगदी किरकोळ जखमांनीही प्रतिस्पर्ध्याचा मृत्यू होत असे. १७६३ मध्ये अमेरिकन क्रांतीपूर्वी वसाहतवादी ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी मूळ अमेरिकन लोकांना देवीच्या विषाणूने माखलेल्या चादरी वाचून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

१९३७-४५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या चीन- जपान युद्धात जपानच्या ‘मंचू युनिट-७३१’ने रोगकारक जिवाणूंचा वापर केला होता. १९४१-४२ साली अमेरिकन आणि ब्रिटिश शास्त्रज्ञांनी हिटलरशासित जर्मनीविरोधात वापरायच्या अँथ्रॅक्स बॉम्बच्या चाचण्या स्कॉटलंडच्या वायव्य किनाऱ्यावरील ग्रुइनार्ड बेटावर घेतल्या होत्या. एम-११४ या बॉम्बचा वापर एम-३३ या संयुक्त बॉम्बमध्ये करण्यात आला होता. याचे नाव ब्रुसेला क्लस्टर बॉम्ब असे होते. हा बॉम्ब १९५० मध्ये तयार करण्यात आला. हे जगातील पहिले अधिकृत जैविक हत्यार मानले जाते.

त्यानंतर २००१-०२ मध्ये दहशतवाद्यांनी वॉशिंग्टन येथील सरकारी अधिकाऱ्यांना अँथ्रॅक्स जिवाणू पत्रातून पाठविले होते. आज विविध राष्ट्रांनी प्रामुख्याने अँथ्रॅक्स, बोटुलिझम, ब्रुसेलॉसिस, पटकी, प्लेग, क्यू-ज्वर, देवी, स्टेफिलोकोकल एंटेरोटॉक्सिन-बी, टेल्यूरेमिया, इबोला या रोगांचे संक्रमण करणाऱ्या सूक्ष्मजीवांना जैविक अस्त्र म्हणून  विकसित केल्याचे अभ्यासक सांगतात. या जंतूंची रोगकारक क्षमता उच्च असते. त्यामुळे होणाऱ्या रोगाविरोधात लस उपलब्ध नसते. उपलब्ध प्रतिजैविकांनी रोग आटोक्यात येत नाही. साथरोगशास्त्रज्ञ संसर्गजन्य आजारांवर नियमित नजर ठेवून असतात, परंतु  संसर्गजन्य आजाराचा स्रोत कृत्रिम आहे की नैसर्गिक याचा उलगडा करणे बहुतेक वेळा अशक्य  असते. क्रिटिकल रिएजंट कार्यक्रमांतर्गत जनुकीय उत्परिवर्तन करून ही जैविक हत्यारे तयार केली जातात. भारतात जैविक अभियांत्रिकी मान्यता समिती (जेनेटिक इंजिनीअिरग अ‍ॅप्रूव्हल समिती) अशा सूक्ष्मजीवांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते. कोविडची साथ हा जैविक युद्धाचा परिणाम असावा, असे भाकीत अनेक जण करत असले, तरी तसा वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal challenge biological warfare causing disease microorganisms ysh
Show comments