डॉ. विद्याधर बोरकर, मराठी विज्ञान परिषद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकोणिसाव्या शतकात ख्यातनाम प्रस्तरवैज्ञानिक चार्ल्स लायेल यांच्या ‘मानवाच्या प्राचीनतेचे भूवैज्ञानिक पुरावे’ (जिऑलॉजिकल एविडन्सेस ऑफ द अँटिक्विटी ऑफ मॅन) या ग्रंथातून आणि उत्क्रांतीवादाचे उद्गाता चार्ल्स डार्विन यांच्या लिखाणातून, मानवाची उत्क्रांती कल्पनेपेक्षा कितीतरी पुरातन आहे याची आपल्याला जाणीव झाली. या दोन्ही संशोधकांचे एकमेकांशी विशेष सख्य होते. दोघांनीही प्रदीर्घ संशोधनाच्या आधारे ग्रंथलेखन केले असल्याने त्यांनी व्यक्त केलेल्या मताला अभ्यासकांची मान्यताही मिळाली.

त्याच सुमाराला बूश द पर्थ या फ्रेंच पुरातत्त्ववेत्त्याला आदिमानवाने तयार केलेली दगडाची आयुधे फ्रान्समधल्या सोमो नदीकाठच्या खडकाच्या प्रस्तरामध्ये आढळली. त्याच प्रस्तरांमध्ये विलुप्त झालेल्या काही सस्तन प्राण्यांचे जीवाश्मही आढळले. त्यावरून मानवाच्या ज्या कोणत्या समूहाने ती दगडाची आयुधे तयार केली होती, त्या समूहाची प्राचीनता किमान सात लाख वर्षे असावी, असा निष्कर्ष बूश द पर्थ यांच्या संशोधनातून निघतो. त्यानंतरही निरनिराळय़ा संशोधकांनी एपसदृश पूर्वजांपासून आदिमानव नेमका कधी उत्क्रांत झाला याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. जसजशी नवीनवी माहिती पुढे येत गेली तसतशी ही प्राचीनता कल्पनेपेक्षा खूपच जास्त आहे, असे लक्षात येऊ लागले.  

अमेरिकन संघराज्याच्या न्यू यॉर्कमधील स्टोनी ब्रुक विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या पुरातत्त्ववेत्त्या डॉ. सोनिया हार्मान्द यांच्या अगदी अलीकडच्या संशोधनातून मानवाच्या प्राचीनतेविषयी नवी माहिती पुढे आली. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०११ ते २०१४ दरम्यान केनियामधल्या तुर्काना नावाच्या विशाल सरोवराच्या परिसरात खूप काळजीपूर्वक क्षेत्रीय सर्वेक्षण केले. तिथल्या लोमेक्वी नावाच्या गावाजवळ आदिमानवांच्या एका गटाने तयार केलेली दगडाची आयुधे त्यांना सापडली. आश्चर्य म्हणजे खडकाच्या ज्या प्रस्तरांमध्ये ही आयुधे आढळली ते प्रस्तर ३३ लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेले आहेत, असे डॉ. हार्मान्द यांच्या निदर्शनास आले.

यावरून त्यांनी दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढले. पहिला म्हणजे दगडाची आयुधे तयार करण्याची कला आपल्या पूर्वजांनी ३३ लाख वर्षांपूर्वीच अवगत केली होती. दुसरा निष्कर्ष अधिक विशेष आहे. इतक्या पूर्वीच्या खडकात मानवाचे जीवाश्म अद्याप आढळलेले नाहीत, पण एपवर्गीय प्रजातींचे जीवाश्म आढळतात. याचा अर्थ असा होतो की ही आयुधे विलुप्त झालेल्या मानवी समूहाने तयार केलेली नव्हती, तर एखाद्या एपवर्गीय समूहाने ती तयार केली होती. अर्थातच त्या समूहाची बुद्धिमत्ता इतर एपवर्गीय समूहांपेक्षा जास्त विकसित होती.