सुट्टयांमधील सहलीचा आनंद घेण्याचे हक्काचे आणि लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे समुद्रकिनारे! लाखो पर्यटकांची पावले वर्षभर या किनाऱ्यांवर उमटत असतात. परंतु, त्यांच्या पाऊलखुणा म्हणून कित्येकदा या किनाऱ्यांवर प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्य पदार्थाची आवरणे, उर्वरित अन्न आणि मद्याच्या बाटल्या बेदरकारपणे फेकलेल्या आढळतात. मन:शांती आणि सौंदर्याच्या ओढीने समुद्रकिनाऱ्याकडे जाणारे पर्यटक परतताना अस्वच्छतेची ‘भेट’ तेथील परिसराला देऊन जातात. कित्येक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर प्रात:र्विधी आटोपले जातात. हे शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी अपायकारक आहे. याशिवाय आपल्याला नको असलेल्या गोष्टी समुद्रकिनाऱ्यावर आणून फेकण्याची सवय अनेकांना असते. या साऱ्याचा पर्यावरणावर आणि तेथील सजीवांवर काय परिणाम होईल, हा विचारदेखील केला जात नाही. किनाऱ्यांवर अत्यंत वेगाने दुचाकी व चारचाकी वाहने चालवल्यामुळे वाळूतील मृदुकाय व कंटकीचर्मी प्राणी चिरडले जातात. काही वेळा हे किनाऱ्यांवरील जीव प्लास्टिकमध्ये अडकून पडलेले दिसतात. यामुळे सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होते. स्थानिक गावकरी त्यांची उपजीविका पर्यटन व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे पर्यटकांच्या या गैरवर्तनाकडे दुर्लक्ष करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्रासंदर्भातील शाश्वत विकास ध्येय

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांची स्थिती फार पूर्वीच अतिशय बिकट झाली होती. त्यामुळे पर्यटकांची पावले सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग येथील किनाऱ्यांकडे वळू लागली. पर्यटन व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाही बऱ्याच अंशी विकसित होऊ लागली आहे आणि स्थानिक रोजगार निर्मितीही वाढली आहे. परंतु, यात समतोल साधला जाताना दिसत नाही. काही ग्रामस्थांनी समुद्राजवळ जनजागृती करणारे फलक लावले आहेत, कचरापेटय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत, प्रवेश शुल्कातून किनारा स्वच्छतेची जबाबदारी उचलली आहे.

ज्या किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवे प्रजोत्पादनासाठी येतात, तिथे आता ‘कासव महोत्सवा’सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. या माध्यमातून जनसामान्यांत संरक्षण आणि संवर्धनाविषयी जागृती करण्यात येते. काही सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षदेखील नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने स्वच्छता मोहिमांचे आयोजन करतात. तरीही हे कार्य अपुरे पडत आहे. म्हणून सर्वांनीच जागरूक राहणे गरजेचे आहे. समुद्रावरील हानिकारक क्रीडाप्रकार, मोठय़ा आवाजात गाणी लावणे वगैरे टाळलेच पाहिजे. समुद्रातील जलचरांवर  आपल्या बेजबाबदार वर्तनाचा घातक परिणाम होतो. सागरी पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे. तरच आपण पुढील पिढीला आनंददायी समुद्रकिनाऱ्याचा वारसा देऊ शकू!

– डॉ. पूनम कुर्वे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal cleanliness of sea coastal importance of beach cleaning importance of cleaning ocean coastal zws