व्हेलला पूर्वी देवमासा म्हणत असत, मात्र ते सस्तन प्राणी आहेत. ते अंडी घालत नाहीत, माता पिल्लांना जन्म देतात, दूध पाजतात. व्हेलना बेंबी आणि फुप्फुसे असतात. पाण्यात राहत असले तरी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन त्यांना घेता येत नाही, म्हणून ते पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन हवेतील ऑक्सिजन घेतात. त्यांच्या उच्छ्वासांच्या वेळी समुद्र्जलाचे प्रचंड कारंजे उसळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाण्यात असतानाही व्हेल स्वरयंत्राने विविध प्रकारचे आवाज काढतात. व्हेल घुमल्यासारखा, रडल्यासारखा, डुरकल्यासारखा, घोरल्यासारखा, हुंकारल्यासारखा, शिटी मारल्यासारखा, विव्हळल्यासारखा आवाज काढू शकतात. उसळी मारून पाण्यावर शरीर आणि शेपूट आपटून आवाज काढू शकतात. शास्त्रज्ञ समुद्रात हायड्रोफोन टाकून व्हेलचे आवाज नोंदवतात. अनेकदा ते माणसाच्या श्रवणक्षमतेबाहेरचे १५ ते ४० हट्र्झमधील अवश्राव्य (इन्फ्रासाऊंड) असतात. याउलट डॉल्फिनच्या आवाजाची वारंवारिता  १,१०,००० हट्र्झ असून स्वनातीत  (अल्ट्रासाऊंड) ध्वनी असते. माणसांना १००० ते ५००० हट्र्झचे ध्वनी नीट ऐकू येतात. स्पर्म व्हेलचा आवाज २३० डेसिबेल  तीव्रतेचा असतो. हवेच्या माध्यमात एवढय़ा तीव्रतेचा आवाज ऐकला तर ऐकणाऱ्यावर गंभीर परिणाम होतो. 

मादी व्हेलच्या आवाजापेक्षा नर व्हेलचा आवाज अधिक गुंतागुंतीचा असतो. आवाजाचा व्हेलना नक्की काय उपयोग होतो, याबद्दल मतभिन्नता आहे. एकमेकांना ओळखण्यासाठी, बोलावण्यासाठी, धोक्याची सूचना देण्यासाठी, प्रणयाराधनेसाठी, अन्न शोधण्यासाठी व्हेलना आवाजाचा उपयोग होत असावा. व्हेल प्रजातींनी स्वतंत्रपणे ध्वनी आणि भाषा निर्माण केलेली आहे. व्हेलची भाषा समूहाप्रमाणे  आणि जातीप्रमाणे बदलते.               

व्हेलची भाषानिर्मिती समजल्यास मानवी भाषानिर्मितीमधील मेंदूचे कार्य समजून घेण्याच्या प्रयत्नांत मदत होईल. शिवाय यावरून  ब्लू-व्हेलचे खोल महासागरातील, ठरावीक ऋतूंतील प्रवासमार्ग ओळखता येतील व मोठय़ा तेलवाहू जहाजांचे मार्ग बदलणे शक्य होईल. अशा उपायांनी व्हेलना माणसामुळे पोहोचणारी हानी टाळता येईल. १९७०च्या दशकात पृथ्वीवरून ‘कालकुपी’ म्हणून एका अवकाशयानामधून पाठवलेल्या ध्वनी-तबकडय़ांत व्हेलच्या आवाजाचाही मानवी भाषांसह समावेश आहे. भविष्यात या अवकाशयानाचा परग्रहांवरील बुद्धिमान जीवांशी संपर्क झालाच तर त्यांना पृथ्वीवरील माणसे आणि व्हेलसारख्या जीवांबद्दल कळू शकेल. पृथ्वीवरच्या हुशार, भिन्न जातीय प्राण्यांशी माणूस संवाद साधू शकला तर त्यांची भाषा समजणे, त्यांचे जीवनानुभव कळणेही सोपे जाईल.

नारायण वाडदेकर ,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal communication between whales amy