सूक्ष्मशैवालांची दुनिया खूपच न्यारी आहे. चमकणाऱ्या सूक्ष्मशैवालांमध्ये प्रामुख्याने करंडक सजीव (डायाटम) आढळतात. हे काचेच्या घरात राहतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पृथ्वीवरील या सजीवाच्या पेशी भित्तिकेमध्ये सिलिका असते. या भित्तिका पारदर्शक असतात. त्यांच्यामध्ये अनेकविध एकाहून एक सुंदर असे नक्षीकाम असते. म्हणूनच त्यांना सागरातील रत्ने असे म्हणतात. त्यांची संख्या २० हजार ते २ लक्ष इतकी आहे आणि शास्त्रज्ञांना दरवर्षी नवीन प्रजातींचा शोध लागतो. ते ज्या पाण्यात राहतात त्या पाण्याच्या गुणधर्मावर आणि आजूबाजूच्या इतर घटकांवरही करंडक सजीवांची वाढ अवलंबून असते.
पाण्यातील पोषक घटकांचे प्रमाण, पाण्यात तरंगणारे घनकण, पाण्याचा गढूळपणा, प्रवाहाची दिशा, त्यातील चढ-उतार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी हस्तक्षेप. यामुळेच डायाटम हे पाण्यातील जैविक परिस्थितीचे मूल्यमापन आणि निरीक्षण करण्यास खूप उपयुक्त ठरतात. हे स्वयंपोषी सजीव आहेत. पाण्यातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम हे सजीव बजावतात. करंडक सजीवामध्ये आकार विविधता आहे. काही वर्तुळाकार, काही लंबगोल, काही आयताकृती, काही त्रिकोणी, काही बाणाचे टोक असल्यासारखे, काही एकटेच असणारे तर काही लांब साखळी करून असणारे. उदाहरणार्थ, कॉक्सिनोडिस्कस, नॅव्हीक्युला, पिन्नुलॅरिया इत्यादी.
सागरात प्रामुख्याने अधिवास असणारे दुसरे सूक्ष्मशैवाल म्हणजे ‘द्विकशाभिक’ (डायनोफ्लॅजेलेट). हे नाव ग्रीक भाषेतील डायनो म्हणजे दोन द्वी आणि लॅटिन भाषेतील फ्लॅजेलेट कशाभिका असलेले. त्यांचा आकार चाबकासारखा दिसतो. या एकपेशीय सजीवाला दोन कशाभिका असतात. आतापर्यंत या प्रकारच्या सुमारे २००० प्रजातींची नोंद झाली आहे, त्यात सुमारे १७०० च्या वर सागरी परिसंस्थेतील आहेत. या पेशींना बाहेरच्या बाजूला अँफीएस्मा नावाचे सेल्युलोजचे बनलेले कवच असते. वेगवेगळय़ा पेशींमध्ये याची रचना विशेष असते. बरेचसे द्विकाशाभिक स्वयंपोषी असले तरी काही मिश्रपोषित तर काही परजीवी आहेत. यांच्यामधील हरितद्रव्य क्लोरोफिल अ आणि क प्रामुख्याने असले तरी झँन्थोफिल या रंगद्रव्य गटातील पेरिडीनिन, डायोझँनथिन आणि डायडिनोझानथिन हेही प्रामुख्याने असल्यामुळे त्यांचा रंग सोनेरी तपकिरी असतो. या एकपेशीय सजीवांमध्ये पुनरुत्पादन अिलगी असते. उदा. जिम्नोडीनियम, सेरॅशिअम, लिंगूलोडीनियम इत्यादी प्रजाती सागरी जीवांना अन्न पुरवण्याचे महत्त्वाचे काम करतात.
डॉ. मंगला बोरकर, मराठी विज्ञान परिषद