प्रिया लागवणकर, मराठी विज्ञान परिषद
निसर्गात जिथे जिथे उपयुक्तता दिसली, त्या त्या गोष्टींचा वापर मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी अगदी प्राचीन काळापासून करून घेतल्याचे आपल्या लक्षात येते. अगदी मृत प्राण्यांच्या आतडय़ाचादेखील यास अपवाद नाही. अत्तराच्या बाटल्या सीलबंद करण्यासाठी पूर्वी प्राण्यांच्या आतडय़ाचा विशिष्ट भाग वापरण्यात येत असे. प्राचीन रोममध्ये तर मेंढी, बकरी अशा प्राण्यांच्या आतडय़ाचा वापर गर्भनिरोधक साधने तयार करण्यासाठी केला जात असे. ‘सॉसेज’ म्हणजे प्राण्यांच्या मांसापासून तयार केलेले कबाब हे एखाद्या नळकांडय़ात भरून बनविले जातात. अनेकदा नळकांडे म्हणून किंवा साचा म्हणून प्राण्यांच्या आतडय़ाचा वापर केला जातो. अशा प्रकारचा वापर फार पूर्वीपासून प्रचलित आहे. इतिहासातही त्याचे दाखले आढळतात.
प्राण्यांच्या आतडय़ावर प्रक्रिया करून अत्यंत मजबूत धागा तयार केला जातो. त्याला ‘कॅटगट’ किंवा ‘आंत्रतंतू’ म्हणतात. आता बहुतेक वाद्यांमध्ये स्टील किंवा कृत्रिम बहुवारिकांपासून बनवलेल्या तारांचा वापर होत असला तरी फार प्राचीन काळापासून तंतुवाद्यांमध्ये या कॅटगटचा वापर केला जात होता. आजही परदेशात हार्पसारख्या काही विशिष्ट वाद्यांमध्ये हाच धागा वापरला जातो. पूर्वी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक पद्धतीच्या घडय़ाळांमध्ये कॅटगटच्या मदतीने विविध वजने टांगून घडय़ाळातील गिअर्सची गती नियंत्रित केली जात असे. चपला आणि केसाळ कातडय़ाचे कपडे शिवण्यासाठीदेखील कॅटगटचा वापर केला जात असे. धनुष्याला लावण्यासाठी लागणारी दोरी म्हणूनसुद्धा याचा वापर होत असे.
अलीकडच्या काही शतकांत या धाग्याचा विघटनशीलतेचा गुणधर्म लक्षात आल्यापासून त्याचा वापर शस्त्रक्रियेत शरीराचा उघडलेला भाग टाके घालून बंद करण्यासाठी केला जाऊ लागला. पण अगदी ख्रिस्तपूर्व काळातसुद्धा प्राण्यांच्या आतडय़ाचा वापर शस्त्रक्रियेची जखम शिवण्यासाठी केल्याचा उल्लेख आहे. आता या कॅटगटऐवजी व्हिक्रिल आणि पॉलिडिओक्सॅनोन यांसारख्या कृत्रिम विघटनशील बहुवारिकांचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. टेनिस रॅकेट तयार करण्यासाठीसुद्धा कॅटगटचा वापर केला जातो. रॅकेटमध्ये पूर्वी हा धागा मोठय़ा प्रमाणात वापरला जात होता. आता कृत्रिम धाग्यांचा वापर होत असला तरीही अधिक चांगल्या दर्जाच्या रॅकेटमध्ये या धाग्यांचा वापर आजही केला जातो. या धाग्याची लवचीकता जास्त असल्यामुळे तो आघात जास्त प्रमाणात शोषून घेतो आणि खेळाडूला टेनिस एल्बोसारख्या दुखण्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता कमी होते.