भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात (बीएआरसी) विविध विज्ञान-आधारित प्रकल्पांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केला जातो. यामध्ये मुख्यत: अणुसंशोधन, अणुसुरक्षा, विदा विश्लेषण आणि स्वयंचलित प्रणाली विकसित करणे या बाबींचा समावेश होतो. बीएआरसीमध्ये मशीन लर्निंगच्या माध्यमातून अणुविघटनातून अथवा संमीलनातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले जाते. त्यातून सुपरवाईज्ड लर्निंग प्रणाली आणि मॉडेल्स वापरून अणुप्रक्रियेचे अंदाज लावणे, किती ऊर्जा निर्माण होईल याचा अदमास लावणे, किरणोत्साराचे प्रमाण मोजणे आणि ते नियंत्रणात ठेवणे, आण्विक प्रक्रिया नियंत्रणात ठेवणे इत्यादी बाबी पार पडल्या जातात.

हेही वाचा >>>  कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन

अणुसुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कृत्रिम बुद्धिमतेच्या डीप लर्निंग, संगणकीय दृष्टी, डीप न्यूरल नेटवर्क वापरामुळे अणुसंयंत्रांमध्ये कोणत्याही धोक्याच्या लक्षणांची पूर्वसूचना मिळवून, सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरून विविध प्रक्रिया, जसे की अणुसंयंत्राची देखभाल, उपकरणांचे नियंत्रण इत्यादी स्वयंचलित केल्या जातात, ज्यामुळे मानवी त्रुटी कमी होतात आणि केंद्र सुरक्षित राहते. कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित सिम्युलेशन आणि आभासी वास्तवाच्या साहाय्याने अणुशक्ती क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील अधिक सुरक्षित आणि प्रभावीपणे केले जाते. फझी लॉजिक तंत्राचा वापर अणुविघटनाच्या अनिश्चित परिस्थितीत अचूक डेटा उपलब्ध नसतानासुद्धा अनुमानित किरणोत्सार नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो. नैसर्गिक शिक्षण प्रणाली वापरून संशोधनासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे विश्लेषण केले जाते. थोडक्यात बीएआरसीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : पारदर्शी कृत्रिम बुद्धिमत्ता – संवाद कौशल्य

‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ (टीआयएफआर) मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संगणकीय जीवशास्त्र, भौतिकशास्त्र संशोधन, संगणक विज्ञान आणि महाकाय विदासंचाचे विश्लेषण यासाठी विशेषत्वाने केला जातो. खगोलशास्त्र आणि उच्च ऊर्जा, भौतिकशास्त्र यासारख्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मशीन लर्निंग, डीप लर्निंग मॉडेल्सचा वापर खगोलीय घटना विश्लेषण, बिग बँग सिद्धांत आणि अणुभौतिकशास्त्रातील प्रयोगांमध्ये डेटा विश्लेषणासाठी केला जातो. टीआयएफआरमध्ये मोठ्या विदासंचाचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचे तंत्रज्ञान वापरले जाते. टीआयएफआरमध्ये नैसर्गिक भाषा प्रक्रिया प्रणालीचा वापर भाषांतर, मजकूर विश्लेषण आणि स्वयंचलित संवाद प्रणालीसाठी होतो. टीआयएफआरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संशोधनाच्या विविध क्षेत्रांमध्ये नवीन मार्ग शोधण्यासाठी केला जात आहे.

अल्पना कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.orgसंकेतस्थळ : http://www.mavipa.org