चेहऱ्यावरून माणसाची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञान कितपत अचूकपणे काम करू शकते? अगदी आदर्श परिस्थिती असेल तर हे तंत्रज्ञान जवळपास अचूकपणे माणसाला ओळखू शकते. प्रत्यक्षात मात्र अशी आदर्श परिस्थिती असेलच असे सांगता येत नसल्यामुळे या तंत्रज्ञानाच्या अचूकतेवर मर्यादा येऊ शकतात. एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेचा संपूर्ण डोलाराच त्याला आपण उपलब्ध करून देत असलेल्या माहितीच्या प्रमाणावर आणि अचूकतेवर उभारलेला असतो. त्यामुळे त्यातच पुरेशी सखोलता नसेल तर ‘फेशियल रेकग्निशन’चे तंत्रज्ञानसुद्धा एका प्रमाणापलीकडे अचूक अंदाज बांधू शकत नाही. सध्या तरी या तंत्रज्ञानाची अचूकता मोजण्यासाठीचे मापक उपलब्ध नाही; पण अर्थातच एका ठरावीक प्रयोगामध्ये त्याची अचूकता किती होती, हे मात्र आपण नक्कीच मोजू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल : चेहऱ्यावरून ओळख पटवणे १

चित्रामधली चेहऱ्यांची जागा, प्रकाश, कुठल्याही अडथळ्यांविना चेहऱ्याचे सगळे तपशील दिसणे, पार्श्वभूमी, कॅमेराचा दर्जा आणि चित्रामधले तपशील अशा अनेक गोष्टींमुळे ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. याखेरीज वयानुसार माणसाच्या चेहऱ्यात बदल होत जातात आणि त्यामुळेही या तंत्रज्ञानाची फसगत होऊ शकते. साहजिकच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकूण वापरांमधल्या धोक्यांसंबंधीचा इशारा ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानालाही अर्थातच लागू पडतो. याचा गैरवापर, त्याने दिलेले चुकीचे निर्णय या सगळ्यांचा विचार करून मगच त्याचा वापर केला जाणे योग्य ठरते. तसेच जर कुणाच्या चेहऱ्याचे तपशील साठवून ठेवायचे असतील तर ही माहिती इतर कुणाच्या हाती लागून तिचा गैरवापर होऊ नये यासाठी संबंधित माणसाचे नाव आणि त्याचे छायाचित्र तसेच त्याविषयीचे तपशील यांच्यामधला परस्परसंबंध पूर्णपणे वेगळा करून साठवणे रास्त ठरते.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एकूण तंत्रज्ञानाप्रमाणे ‘फेशियल रेकग्निशन’च्या तंत्रज्ञानातही आपण आपल्याला हव्या त्या पातळीनुसार मिळत असलेल्या निकालांचा अन्वयार्थ लावू शकतो. उदाहरणार्थ समजा माणसाचा चेहरा ओळखून त्यानुसार लगेच त्याला पुढची कृती आपोआप करू द्यायची असेल तर त्यासाठी आपण ९९ टक्के अशी पातळी ठरवू शकतो. उदाहरणार्थ समजा विमानतळात प्रवेश करत असताना एखाद्या प्रवाशाच्या चेहऱ्यामधील अपेक्षित तपशिलांतील ९९ टक्के तपशील जुळत असतील तर त्याला विनाअडथळा पुढे जाऊ दिले जाते. मात्र हा आकडा ९९ टक्क्यांच्या खाली असेल तर तिथले दार त्याला अडवेल आणि सुरक्षा रक्षकाच्या तपासणीनंतरच तो प्रवासी पुढे जाऊ शकेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अफाट जगामधला एक कळीचा दुवा म्हणून ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाचे महत्त्व उद्याच्या जगात अनन्यसाधारण असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही!

अतुल कहाते

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal facts about facial recognition technology with artificial intelligence zws