डॉ. प्रसाद कर्णिक
डॉ. विनय दत्तात्रय देशमुख हे हाडाचे वैज्ञानिक, तळमळीचे शिक्षक, अनेकांचे मार्गदर्शक मित्र आणि सच्चे मत्स्यप्रेमी होते. ‘केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन केंद्र (सीएमएफआरआय), मुंबई’ येथून प्रमुख आणि प्रभारी वैज्ञानिक म्हणून प्रदीर्घ सेवेनंतर डॉ. विनय देशमुख निवृत्त झाले होते. आयुष्यातील बराचसा काळ त्यांनी मुंबईत वास्तव्य केले असले तरीही त्यांचे बालपण व शालेय शिक्षण हे सध्याच्या रायगड जिल्ह्यातील तळे या गावी झाले. शेवटपर्यंत ते त्यांच्या मूळ गावाशी तनमनाने जोडलेले होते. शाळेत असल्यापासून अत्यंत हुशार आणि अभ्यासू असलेले डॉ. विनय देशमुख हे योगायोगाने मूलभूत विज्ञान शाखेत आले आणि आपल्या देशाला एक उत्तम मत्स्यशास्त्र अभ्यासक लाभला.
त्यांचा विद्यावाचस्पती पदवीचा विषय कोळंबी असला तरी मत्स्यविज्ञानातील अशी एकही शाखा नसेल जिचा त्यांनी सखोल अभ्यास केला नाही. प्रत्येक नवीन विषयाला हात घातला की ते सर्वस्व झोकून देऊन अभ्यास करत. एक शोधनिबंध लिहिण्यासाठी किमान पाच वर्षे तपशीलवार अभ्यास करायला हवा, असा डॉ. देशमुख यांचा आग्रह होता. सत्तरीच्या दशकात डॉ. देशमुख सीएमएफआरआय या संस्थेत कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून रुजू झाले आणि जवळपास ३५ वर्षे तिथे कार्यरत होते. निवृत्तीनंतरही अक्षरश: शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे कार्य सुरू होते. ‘मासे जाणून घेऊ या’ हे उत्कृष्ट पुस्तक ही त्यांनी वाचकांना दिलेली मोलाची भेट ठरली, मात्र हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
राज्य व केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण समित्यांवर ते अभ्यासक म्हणून कार्यरत होते. उदा. एमएमआरडीएच्या ट्रान्स हार्बर प्रकल्पाच्या सुकाणू समितीचे मुख्य सल्लागार, सोमवंशी समितीचे उपाध्यक्ष इत्यादी. डॉ. विनय देशमुख यांचा पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे प्रश्न, नवीन तंत्रज्ञानाचा त्यांच्यावर होणारा परिणाम अशा अनेक विषयांवर सखोल अभ्यास होता. मासेमारीचे मोठय़ा प्रमाणावर होणारे यांत्रिकीकरण, एलईडी दिव्यांचा वापर, खाडी-समुद्रतळ खरवडणारी ट्रोल जाळी यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला. यावर डॉ. देशमुख यांनी सुचवलेले उपाय तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांनादेखील अमलात आणावे लागले होते. राज्यातील मच्छीमार समाजाचे ते मार्गदर्शक, सल्लागार, सच्चे मित्र आणि हितचिंतक होते. त्यांच्या अकाली निधनाने मत्स्यशास्त्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.