प्रिया लागवणकर, मराठी विज्ञान परिषद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जंगलात राहणारा आदिमानव अन्नासाठी शिकार केलेल्या प्राण्यांची केसाळ कातडी संरक्षणासाठी कमरेभोवती गुंडाळत असे. हे कातडे काही दिवसांनी कुजून जात असे. पण नंतर मानवाला हे समजले की कातडय़ावर विशिष्ट नैसर्गिक पदार्थाची प्रक्रिया केली तर ते कुजत तर नाहीच उलट टिकाऊ होते. तेव्हापासून कातडय़ावर अशा प्रकारची प्रक्रिया होऊ लागली. यालाच ‘कातडे कमावणे’ किंवा ‘टॅनिंग’ असे म्हटले जाते.

अगदी सुरुवातीच्या काळात शेकोटीच्या धुरावर टांगून किंवा ताणलेल्या कातडय़ाला तेल लावून मऊ करून कातडे कमावण्यात येत असे. प्राचीन हिब्रू लोकांनी कातडे कमावण्यासाठी ओक वृक्षाच्या सालीचा उपयोग करायला सुरुवात केली. ओक वृक्षासारख्या काही विशिष्ट झाडांच्या सालीपासून मिळणारे ‘टॅनिन’ नावाचे रासायनिक संयुग चामडय़ाचे उत्पादन करण्यासाठी वापरले जात असे. त्यावरूनच या प्रक्रियेला इंग्रजीत ‘टॅनिंग’ हे नाव पडले. या प्रक्रियेत कातडे स्वच्छ करून त्यावरचे केस काढून टाकले जातात आणि मग ते ठरावीक कालावधीसाठी टॅनिनच्या द्रावणात बुडवून ठेवले जाते. यामुळे कातडय़ातील तंतूंच्या संरचनेत असा बदल होतो की जिवाणू आणि बुरशीचा त्यावर परिणाम होत नाही. 

इजिप्तमधील उत्खननांत सुमारे तीन हजार ३०० वर्षांपूर्वीच्या आणि अजूनही न कुजलेल्या कातडय़ाच्या वस्तू सापडल्या होत्या. प्राचीन ग्रीक लोक कातडय़ापासून चिलखत, होडय़ा, कपडे तयार करत; तर रोमन लोक कातडय़ाची नाणीही बनवत असत. कातडी चेंडूचा उपयोग प्रथम जपानमध्ये करण्यात आला. बर्लिन येथील संग्रहालयामध्ये सुमारे चार हजार वर्षांपूर्वी वाघाचे कातडे कमावीत असलेल्या एका कारागिराची दगडी मूर्ती आहे. वैदिक काळातील ग्रंथांमधून चामडय़ाची पादत्राणे, पखाली, द्रव पदार्थ साठविण्यासाठी लागणारी बुधली अशा वस्तूंचा उल्लेख आढळतो.

कातडे कमावण्यासाठी टॅनिनप्रमाणेच तुरटीचाही वापर पूर्वीपासून केला गेला आहे. चामडय़ाचे हातमोजे तयार करण्यासाठी याच प्रक्रियेची सुधारित आवृत्ती आजही वापरण्यात येते. १८००च्या दशकात कातडे कमावण्यासाठी नैसर्गिक टॅनिनऐवजी प्रथमच क्रोमिअम क्षारांचा वापर करण्यात आला. पोटॅशियम बायक्रोमेटच्या द्रावणात साखर घालून तयार केलेले मिश्रण यासाठी वापरले जाऊ लागले.

१८९८च्या सुमारास अल्डिहाइडचा वापर करून कातडे कमावण्याची प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. आता या प्रक्रियेत झिओलाइट क्षारांचा वापर केला जातो. ही प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे. कातडे कमावण्याच्या प्रक्रियेत मृत प्राण्याचे कातडे घेतले जात असे. आज मात्र कातडय़ासाठी प्राण्यांची मुद्दाम हत्या करण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे. गरज आणि हव्यास यातली सीमारेषा आपण ओळखायला नको का?