मोती हा मृदुकाय संघातील, शिंपाधारी वर्गातील कालवं (ऑयस्टर) या प्राण्याच्या शरीरात निर्माण होणारा आणि रत्न म्हणून मान्यता पावलेला कठीण पदार्थ आहे. मोत्यांची निर्मिती प्रामुख्याने पिंक्टाडा जातीतील कालवांत होते. ही कालवं भारतात कच्छ, मनारचे आखात, पाल्कची सामुद्रधुनी येथे सापडतात. मोती कालवं समुद्रात १८ ते २२ मीटर खोलीवर खडकाळ, रेताड भागात किंवा मृत प्रवाळांना चिकटलेली आढळतात. वाळूचा कण, शिंपल्याचा तुकडा, एखादा सूक्ष्मजीव शिंपल्यात शिरला की आतील जिवाला टोचू लागतो. हा टोचणारा कण किंवा जीव पुन्हा बाहेर न टाकता टोचणी कमी व्हावी म्हणून शिंपल्यातील प्राणी आपल्या शरीरातून कॅल्शिअम काबरेनेट, कोंचीओलीन आणि पाणी याच्या मिश्रद्रावाचे थर त्याच्यावर चढवू लागतो. या स्रावाचे समकेंद्री थर एकावर एक साचून मोती तयार होतो.
हेही वाचा >>> कुतूहल : मोती देणारी कालवं
मोती तयार होताना शिंपले कधी कधी पाण्याच्या बाहेर फेकले गेल्याने योग्य पोषणाअभावी मोत्यांच्या आकारावर विपरीत परिणाम होतो. ओबडधोबड आकाराच्या मोत्यांना ‘बरोक’ म्हणतात. पूर्ण गोल, आकर्षक रंगाचे, चमकदार व जड मोती हे उत्तम प्रतीचे समजले जातात. पर्शियन आखातात सर्वोत्तम दर्जाचे मोती सापडतात. फिलिपाईन्सच्या समुद्रात सापडलेल्या सुमारे ६० सेंटिमीटर लांब व ३० सेंटिमीटर रुंदीचा ३४ किलो वजनाच्या मोत्याची आजवरचा सर्वात मोठा मोती म्हणून नोंद झाली आहे. बहुतांश मोत्यांचा रंग रुपेरी असून राखाडी, गुलाबी, सोनेरी छटा असणारे मोतीही नैसर्गिकरीत्या तयार होतात. काळय़ा रंगाचे मोती दुर्मीळ असतात. मोत्यांचा उपयोग प्राचीन काळापासून अलंकार तयार करण्यासाठी होतो. आयुर्वेदिक तसेच युनानी औषधांमध्ये नैसर्गिक मोत्यापासून बनवलेले भस्म वापरतात.
नैसर्गिक प्रक्रियेतून मिळणाऱ्या मोत्यांचे प्रमाण फार कमी असल्याने कृत्रिमरीत्या मोती संवर्धन केले जाते. हे तंत्र सर्वप्रथम जपानमध्ये विकसित झाले. नियंत्रित परिस्थितीत कालवांना भूल देऊन त्यांचे शिंपले उघडून केंद्रकाचे म्हणजेच कृत्रिम कणांचे रोपण करून शिंपला पुन्हा बंद करतात. काही काळानंतर तेथे मोती तयार होतो. मोती शिंपल्यातून बाहेर काढल्यानंतर चमक आणण्यासाठी काही रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. हेच कल्चर्ड मोती. मोती संवर्धनाद्वारे ग्रामीण युवकांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. तुतीकोरीन येथील मत्स्यसंशोधन संस्थेमध्ये याचे प्रशिक्षण दिले जाते.
– डॉ. सीमा खोत
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org