डॉ. विद्याधर बोरकर, मराठी विज्ञान परिषद
आज ज्या प्रदेशाला आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो तो फार प्राचीन काळी गोंडवनलँड नावाच्या महाखंडाचा भाग होता. उत्तरेकडचा गाळाचा मैदानी प्रदेश आणि हिमालय पर्वत तेव्हा अस्तित्वातही नव्हते. कालांतराने गोंडवनलँडची टप्प्याटप्प्याने शकले झाली. ११ कोटी वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्पापासून विलग झाल्याने बंगालच्या उपसागराची आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्याची निर्मिती झाली. या घडामोडीमुळे पुदुचेरीपासून तंजावपर्यंतच्या किनाऱ्यालगतच्या सखल प्रदेशावर नव्याने निर्माण झालेल्या समुद्राने अतिक्रमण केले. ते जवळजवळ साडेचार कोटी वर्षे टिकले.
त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या सजीवांच्या शेकडो प्रजाती त्या समुद्रात सुखेनैव नांदत होत्या. या साडेचार कोटी वर्षांमध्ये या समुद्रात जो हजारो टन गाळ साचला, त्यात कोटय़वधी सागरी प्राण्यांचे मृतदेह गाडले गेले. हा समुद्र हटल्यानंतर त्यात साठलेल्या गाळाचे खडक तयार झाले. आज ते खडक पूर्वघाट डोंगररांग आणि भारताचा पूर्वकिनारा यांच्या मधल्या पट्टय़ात आढळतात.
ज्या प्राण्यांचे मृतदेह त्या गाळात गाडले गेले होते त्यांचे जीवाश्म झाले. या जीवाश्मांमधला एक वैशिष्टय़पूर्ण आणि भला मोठा जीवाश्म सतनूर गावानजीक आहे. हा जीवाश्म आहे एका सूचिपर्णी वृक्षाच्या खोडाचा. त्याची लांबी आहे अठरा मीटर, तर घेराची रुंदी आहे एक मीटरपेक्षा थोडीशी अधिक! जमिनीवर वाढणाऱ्या एका खूप मोठय़ा वृक्षाचे हे इतके अगडबंब खोड उथळ समुद्रात पोहोचले कुठून, असा प्रश्न एखाद्याला पडला तर नवल नाही. त्या काळातल्या या उथळ समुद्राच्या किनाऱ्यालगत पूर्वघाट डोंगरांची रांग होती. त्याचा उतार थेट तत्कालीन समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचत होता. या डोंगररांगांवर त्या प्राचीन काळातल्या जंगलात आजच्यापेक्षा अगदी वेगळय़ा वनस्पती असणार हे उघड आहे. त्यात प्रकटबीजी (जिम्नोस्पर्मी) वृक्षांचे प्राबल्य होते.
या जंगलात कधीतरी जीर्ण झालेला एखादा वृक्ष उन्मळून पडत असे. जोराचा पाऊस पडला की त्या वृक्षाचे खोड उतारावरून घसरत, घरंगळत जवळच समुद्रातल्या गाळात गाडले जाई. अशाच एका, पण खूप मोठय़ा सूचिपर्णी वृक्षाच्या खोडाचे शेवटचे विश्रांतीस्थान आजच्या सतनूर गावाजवळ आहे. काळाच्या ओघात या खोडाचे रूपांतर एका प्रचंड मोठय़ा जीवाश्मात झाले आहे. हा दुर्मीळ जीवाश्म बघण्यासाठी जीवाश्मांचे अभ्यासक सतनूरला आवर्जून भेट देतात. भारत सरकारच्या ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ विभागाने तिथे राष्ट्रीय उद्यान विकसित केले आहे.