डॉ. विद्याधर बोरकर, मराठी विज्ञान परिषद

फार पूर्वी दक्षिण गोलार्धात गोंडवनलँड नावाचे महाखंड होते. पण हे गोंडवनलँड नाव आले कुठून? आणि त्या महाखंडाला हे नाव दिले कोणी? भारतात लोहमार्गावरून पहिली प्रवासी गाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावल्यानंतर आपल्याकडे लोहमार्गाच्या निर्मितीची लाट आली आणि दगडी कोळशाची मागणी वाढली. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या विभागाने १८६८ मध्ये जोसेफ जॉर्ज मेडलिकॉट आणि हेन्री बेनेडिक्ट मेडलिकॉट या दोघा भावांना तत्कालीन मध्य प्रांतात कोळशाच्या साठय़ांचा शोध घेण्यासाठी पाठवले.

सध्याच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही जिल्हे मिळून होणाऱ्या भूप्रदेशात गोंड आदिवासी फार मोठय़ा प्रमाणात राहातात. ‘गोंडवन’ हे त्या प्रदेशाचे परंपरागत नाव आहे. कोळशासाठी सर्वेक्षण करणाऱ्या मेडलिकॉट बंधूंपैकी हेन्री मेडलिकॉट फावल्या वेळात गोंड आदिवासींच्या वस्त्यांवर जाऊन त्यांच्या राहणीमानाची आणि चालीरीतींची माहिती मिळवत. गोंडवन या नावाशी त्यांचे नातेच जडले. साहजिकच दोघा बंधूंनी शोधून काढलेल्या तिथल्या पाषाणसमूहाला नाव देताना मोठय़ा आवडीने नाव दिले ‘गोंडवन प्रस्तरमालिका’ (मूळ इंग्रजीतील नाव ‘गोंडवन सीरिज’).

गोंडवन प्रस्तरमालिकेपैकी दगडी कोळशाचा समावेश असणारे पाषाणप्रस्तर पृथ्वीच्या इतिहासातील पर्मिअन कालखंडात निर्माण झाले. ज्या वनस्पतींपासून कोळसा निर्माण झाला त्यांचे अत्युत्कृष्ट जीवाश्म त्या पाषाणप्रस्तरात मोठय़ा प्रमाणात मिळतात. त्या जीवाश्मांचा अभ्यास डॉ. ओट्टोकार फाइष्टमांटेल यांच्याकडे सोपवण्यात आला. फाइष्टमांटेल यांनी हा अभ्यास कसून केला. याच वनस्पतींचे जीवाश्म अंटाक्र्टिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या खंडांमधील पर्मिअन कालखंडातील प्रस्तरांमध्येही मिळतात, हेही त्यांच्या निदर्शनास आले.

फाइष्टमांटेल ऑस्ट्रियन होते. रजा घेऊन मायदेशी गेले असता तिथे त्यांची गाठ व्हिएन्ना विद्यापीठातील डॉ. एदुआर्द झिस या ज्येष्ठ भूवैज्ञानिकांशी पडली. डॉ. झिस त्या वेळी खंडांच्या परिवहनाच्या सिद्धांतावर विचारमंथन करत होते. वनस्पतींच्या जीवाश्मांचा मुद्दाही त्यांच्या विचाराधीन होताच. भारतातील गोंडवन प्रस्तरमालिकेतील वनस्पतींचे जीवाश्म अन्य खंडांमधील पर्मिअन कालखंडातील प्रस्तरांमध्येही मिळतात. या फाइष्टमांटेल यांच्या संशोधनाने ते खूपच प्रभावित झाले. कारण पाच खंड मिळून दक्षिण गोलार्धात एकच विशाल महाखंड होते या निष्कर्षांसाठी तो अतिशय भक्कम पुरावा होता. खंडांच्या परिवहनाच्या सिद्धांताला अंतिम रूप देताना डॉ. झिस यांनी त्या महाखंडाला गोंडवनलँड असे नाव दिले.

Story img Loader