पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ७० टक्क्यांहून अधिक हिस्सा महासागरांनी व्यापला आहे. वाटतो त्यापेक्षा सागर प्रत्यक्षात खूप खोल आहे. या अथांग जलाशयाच्या उदरात काय दडले आहे, याचा ठाव घ्यायचा म्हटले, तर सुरुवातीला किनाऱ्यापासून सुरू होणारा आणि अलगद सागराच्या कुशीत शिरणारा भूमीचा उतार येतो. याला ‘खंडान्त उतार’ (कॉन्टिनेन्टल स्लोप) म्हणतात. किनाऱ्यालगतचा उतार सौम्य असतो. नंतर किनाऱ्यापासून काही अंतर आणखी पुढे गेल्यावर उतार एकाएकी तीव्र होतो. त्याच्यापुढे गेल्यावर खोल सागरतळ लागेल. त्यावर कुठे सपाट मैदाने, तर कुठे महादऱ्या (कॅनियन्स), आणि कुठे गर्ता (ट्रेंचेस) आहेत. काही ठिकाणी डोंगररांगा आणि ज्वालामुखीदेखील आहेत.
जसजसा विज्ञानाचा विकास झाला तसतसे सागरतळाचे तपशील आपल्याला अधिकाधिक समजू लागले. सागरतळावरच्या या सर्व भूरचनांचा अभ्यास हा ‘सागरी भूविज्ञान’ या विज्ञानशाखेचा भाग आहे. अमेरिकेतले भूवैज्ञानिक फ्रान्सिस पार्कर शेपर्ड यांनी कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या महादऱ्यांचे सर्वेक्षण करून सागरी भूविज्ञानाला फार मोठी चालना दिली. म्हणून त्यांना सागरी भूविज्ञानाचे जनक म्हणतात. समुद्र पातळीत होणाऱ्या बदलांचे पुरावे त्यांना सापडले. पाण्याखाली असणाऱ्या महादऱ्यांची झीज होत असते हेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले.
१० मे १८९७ रोजी मॅसॅच्युसेट्स राज्यातल्या मार्बलहेड गावी एका सधन कुटुंबात फ्रान्सिस यांचा जन्म झाला. त्यांचे उच्च शिक्षण हार्वर्ड आणि शिकागो विद्यापीठात झाले. त्यांचा विषय होता भूविज्ञान. रॉकी पर्वतरांगांच्या भूवैज्ञानिक संरचनांचा अभ्यास करून त्यांनी प्रबंध सादर केला, आणि १९२२ मधे डॉक्टरेट प्राप्त केली. त्याच वर्षी इलिनॉय विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली. १९४२ मधे ते कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या स्क्रिप्स महासागरविज्ञान संस्थेत (स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी) रुजू झाले.
सागरतळाविषयी त्यांचे संशोधन ऐन भरात असताना दुसऱ्या महायुद्धाला प्रारंभ झाला. अमेरिकेच्या नाविक दलाला शेपर्ड यांच्या संशोधनाचा खूपच उपयोग झाला. पर्ल हार्बरच्या गाजलेल्या हल्ल्याचे विश्लेषण करण्यासाठीही शेपर्ड यांनी नाविक दलाला मदत केली. यामुळे सागरी भूविज्ञान या विषयाचे महत्त्व अधोरखित झाले.
सागरी भूविज्ञानात सागरतळाचा इतिहास, त्याची भूभौतिकी (जिओफिजिक्स), भूरसायनविज्ञान (जिओकेमिस्ट्री), अवसादविज्ञान (सेडिमेंटोलॉजी), पुराजीवविज्ञान (पॅलिऑन्टॉलॉजी) आणि अन्य आनुषंगिक पैलू यावरसुद्धा संशोधन केले जाते. ५ एप्रिल १९८५ रोजी फ्रान्सिस यांचे निधन झाले. तथापि त्यांनी लिहिलेले ‘सबमरीन जिऑलॉजी’ हे पाठ्यपुस्तक, इतर दहा पुस्तके आणि २०० शोधनिबंध अभ्यासकांना नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असे आहेत.
– डॉ. श्वेता चिटणीस
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org