भारतात कांदळवने किंवा खारफुटी वने देशाच्या नऊ राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांत आढळतात. त्यांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे चार हजार ९७५ चौरस किलोमीटर आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरात या दोन राज्यांत कांदळवने मोठय़ा प्रमाणात पसरलेली असून ती अनुक्रमे सुमारे दोन हजार ११२ चौरस किलोमीटर आणि एक हजार १७७ चौरस किलोमीटर आहेत. अंदमान आणि निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, गोवा, कर्नाटक, केरळ, दमण आणि दीव तसेच पाँडिचेरी येथे पसरली आहेत. पश्चिम बंगालमधील सुंदरबन, ओरिसातील भित्तरकनिका, आंध्र प्रदेशात गोदावरी-कृष्णा त्रिभुज प्रदेश, गुजरातेत कच्छ, महाराष्ट्रात ठाणे खाडी, तमिळनाडूत पिचावरम, गोव्यात कोराओ बेट, तसेच अंदमानातील बरतांग बेटे या प्रदेशांत महत्त्वाची कांदळवने आहेत.
भारताच्या पूर्वेकडील सुंदरबनमध्ये एकूण १५ कुलांतील २४५ प्रजातींच्या मिळून ३३४ प्रकारच्या वनस्पती आहेत. शैवालांची संख्या १६५ असून ऑर्किडच्या १३ जाती आढळतात. एव्हीसिनिया मरिना किंवा राखाडी मॅन्ग्रोव ही वनस्पती गुजरातमधील कच्छ भागात मोठय़ा प्रमाणात आढळते. सोनरेशिया अल्बा किंवा पांढरी चिप्पी ही वनस्पती महाराष्ट्राचे खारफुटी मानचिन्ह आहे. हायझोफोरा ही वनस्पती पिचावरमची खासियत आहे. कृष्णा- गोदावरी खोऱ्यात काळय़ा खारफुटीचे प्राबल्य असून ब्रुगेरा वनस्पती आढळते.
दलदलीच्या ठिकाणी हे कांदळवन पसरलेले आहे. तिथे सामान्य माणूस सहज जाऊ शकत नसल्याने कांदळवनाबद्दल अनभिज्ञता आहे. खारफुटी वनांचे महत्त्व अनेकांना अद्याप पुरेसे समजलेले नाही. परंतु एका वाक्यात त्यांचे महत्त्व सांगायचे झाल्यास संशोधकांच्या मते ‘कांदळवन परिसंस्था जी पर्यावरणीय सेवा पुरवते त्याची किंमत दर हेक्टरी सुमारे एक लाख ९४ हजार डॉलर इतकी असेल.’
एका अभ्यासानुसार १९८०-२००० या वीस वर्षांत जगातून सुमारे ३५ टक्के कांदळवने नष्ट झाली असावीत असा अंदाज आहे. कांदळवने वेगवेगळय़ा कारणांसाठी नष्ट केली जातात. आपल्या येथे नवी मुंबई पूर्णत: कांदळवनावरच उभारली गेली. भराव घालून भूक्षेत्र वाढवताना कांदळवने नष्ट केली जातात. अन्ननिर्मितीसाठी जलचरांची शेती केली जाते तेव्हा मोठय़ा प्रमाणात कांदळवन नष्ट होते, त्याचप्रमाणे कांदळवनातील झाडे जळणासाठी तोडली जातात. जागतिक तापमानवाढीचे संकट आल्यामुळे बर्फ वितळू लागल्याने खारफुटीची वने पाण्याखाली जाऊन हळूहळू नष्ट होत आहेत.
दीपिका कुलकर्णी,मराठी विज्ञान परिष