डॉ. प्रसाद कर्णिक, मराठी विज्ञान परिषद
डॉ. विनय देशमुख आणि डॉ. नंदिनी देशमुख यांनी लिहिलेले आणि ‘कांदळवन प्रतिष्ठान’ने प्रकाशित केलेले ‘मासे जाणून घेऊया’ हे पुस्तक या विषयातील अनभिज्ञासाठी अत्यंत उपयुक्त माहिती रंजक पद्धतीने देणारे आहेच; शिवाय, या विषयातील अभ्यासकांनादेखील संदर्भासाठी उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. विनय देशमुख हे सागरी मत्स्यविषयातील गाढे अभ्यासक. आपल्या संशोधनाचा आणि अनुभवाचा लाभ मच्छीमार समाजाला व्हावा, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत. मच्छीमारांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असत. सामान्य माणसांनाही मासे किंवा एकंदरच जलचरांविषयी कुतूहल असते. अशा जिज्ञासूंपर्यंत माशांविषयी सखोल आणि साद्यंत माहिती पोहोचावी हा या पुस्तकामागचा हेतू. दुर्दैवाने, काळाने अकाली घाला घातल्याने, डॉ. विनय देशमुख हे पुस्तक पूर्ण करू शकले नाहीत, मात्र त्यांच्या उच्चविद्याविभूषित, सुविद्य पत्नी डॉ. नंदिनी देशमुख यांनी ते केवळ पूर्ण केले नाही, तर ‘कांदळवन प्रतिष्ठान’च्या माध्यमातून प्रकाशितही केले.
या पुस्तकात, आपल्या राज्यात व देशात मिळणाऱ्या ४८०हून अधिक माशांची साग्रसंगीत माहिती दिली आहे. मत्स्यसंपदा, माशांची शरीररचना, मासे समजून घेणे, ताजे मासे ओळखण्याच्या खुणा, मत्स्याहार कसा आरोग्यदायी आहे, माशांची स्वच्छता, मत्स्याहार करणाऱ्यांनी तो आरोग्यदायी ठरावा यासाठी कोणती काळजी घ्यावी, मासे विक्रीची साखळी, विपणन व्यवस्था, मासे टिकवून ठेवण्याच्या आणि खाण्याच्या पद्धती अशा अनेकविध विषयांचा निव्वळ बौद्धिक नव्हे तर सर्वाना आवडेल आणि भावेल अशा रीतीने लेखाजोखा घेतला आहे. परिशिष्टांत, ‘कोणते मासे कधी खावेत’ आणि ‘माशांची सामान्य आणि शास्त्रीय नावे’ यावर उपयुक्त तक्ते दिले आहेत. माशांच्या तपशीलवार माहितीसह महाराष्ट्राला लाभलेला सागरकिनारा, मुंबईतील ससून डॉक, फेरी वार्फ किंवा भाऊचा धक्का, वेसावे आणि रत्नागिरीतील मिऱ्याबंदर, हर्णे अशी मोठी आणि छोटी मिळून १५८ लँडिंग सेंटर्स, मासेमारीच्या चार हजार २९० यांत्रिक बोटी तसेच २६२ आधुनिक जाळी, ४८० माशांच्या प्रजातींसोबत आपल्या राज्यालगतच्या समुद्रात आढळणाऱ्या इतर जाती (कोलंबी, खेकडे, शेवंडी, तिसऱ्या, कालवे इत्यादी) अशी अत्यंत महत्त्वाची माहिती हे या पुस्तकातील मजकुराचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. मानवी आरोग्याला मत्स्यखाद्य किती आणि कसे पूरक आहे, हे लेखकांनी सप्रमाण पटवून दिले आहे. थोडक्यात ‘मासे जाणून घेऊया’ या पुस्तकात मत्स्य विषयावरील महत्त्वपूर्ण माहिती अगदी सर्वाना सहज समजेल अशा भाषेत संक्षिप्त रूपात सादर करण्यात आली आहे.