फुलपाखरे रंगीबेरंगी छान, नाजूक, चंचल असतात. अलगद पकडूनही त्यांचे पंख तुटू शकतात. ती चावू शकत नाहीत. लांबलचक, चकलीसारख्या गुंडाळलेल्या सोंडेने ती फुलांतील गोड रस पितात. घनपदार्थ खाऊ शकत नाहीत. फुलपाखरे संधिपाद प्राणीसंघ, कीटकवर्ग, लेपिडोप्टेरा गणात मोडतात. पतंगही फुलपाखरांप्रमाणेच लेपिडोप्टेरा गणातलेच; पण फुलपाखरांइतके नाजूक, आकर्षक, रंगांचे नसतात. ते पानांवर बसतात तेव्हा पंख जमिनीलगत पसरून स्थिरावतात. फुलपाखरे पाना-फुलांवर बसतात तेव्हा पंख शरीराला काटकोनात ठेवतात.
फुलपाखरे आणि पतंगही स्थलांतर करतात. स्थलांतर म्हणजे ठरावीक ऋतूत, एखाद्या जातीच्या लाखो प्राण्यांचे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे. काही जातींची फुलपाखरे पूर्ण आयुष्यात एकाच दिशेने स्थलांतर करतात. परतत नाहीत. नव्या जागी त्यांचे आयुष्य संपते. इतर काही जातींची फुलपाखरे एखाद्या जागी फार कडक उन्हाळा-हिवाळा असेल तर स्थलांतर करून नव्या, परिस्थिती सुसह्य असलेल्या जागी जातात. सुखाने जगतात. नव्या जागी कडक उन्हाळा-हिवाळा सुरू होण्याआधी जुन्या आता सुसह्य बनलेल्या जागी परततात.
फुलपाखरे स्थलांतर करून जीवनस्नेही जागेवर राहतात. दुर्बल शरीराची, सूक्ष्मजीवजंतूंसारख्या परजीवांनी संक्रमित फुलपाखरे स्थलांतर करू शकत नाहीत. लोकसंख्येतून गळून पडतात. निरोगी, पर्यावरण अनुकूलित फुलपाखरे जीवनकलहात टिकून राहतात. फुलपाखरे स्थलांतराने परागवहन करून देशोदेशी वनस्पतींचा प्रसार करतात. बव्हेरिया ते डची अशी फुलपाखरांच्या जर्मनीतील दक्षिणोत्तर स्थलांतराची इ.स. ११०० मधील आतापर्यंतची पहिली नोंद असावी. खूप उंचावरून स्थलांतर करणारी फुलपाखरे डोळय़ांनी दिसत नाहीत पण रडारच्या मदतीने टिपता येतात. सूर्यकिरणांचा जमिनीशी होणारा कोन, ऋतू, तापमानातील बदल, चुंबकीय क्षेत्र असे घटक भिन्न जातींच्या फुलपाखरांना स्थलांतर करा असे सुचवत असतात.
नाजूक वाटणारी फुलपाखरे वाऱ्यावर आरूढ होऊन हजारो किलोमीटरचेही स्थलांतर करतात. पेंटेड लेडीज फुलपाखरे अंटाक्र्टिका आणि ऑस्ट्रेलिया सोडल्यास जगभर सर्वत्र आढळतात. ती आफ्रिकेतून युरोप ते आक्र्टिक वर्तुळ आणि उलट पोहोचताना १४ हजार किमी प्रवासात वाटेतील समुद्रापार येतात. प्रवासात पाचसहा नव्या पिढय़ा जन्मतात, जुन्या दगावतात.
कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळमधील हौशी विज्ञानप्रेमी ‘व्हॉट्स अॅप’ गटांनी सह्याद्री ते श्रीलंका स्थलांतरकर्त्यां फुलपाखरांची (क्रिमझन रोझ) माहिती सामायिक करायला सुरुवात केली आहे. सोबतचे छायाचित्रही अशा ‘क्रिमझन रोझ’ जातीच्या फुलपाखराचे आहे.
नारायण वाडदेकर ,मराठी विज्ञान परिषद