भारतातील सुमारे अडीच लाख नागरिक जगातील विविध जहाज कंपन्यांमध्ये काम करीत आहेत. भारतीयांना या क्षेत्रात असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात जवळपास १५० संस्था, विविध हुद्दय़ांवर काम करण्यासाठी उमेदवारांना प्रशिक्षण देतात. अँग्लो ईस्टर्न मेरिटाइम अ‍ॅकॅडेमी (एमा) ही संस्था जहाजांवरील भावी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अशीच एक संस्था आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई आणि पुण्याच्या जवळपास मधोमध कर्जतजवळ सुमारे ५० एकर परिसरात २००९ मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली. हाँगकाँग येथील अँग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेंट कंपनीकडे आजमितीस सुमारे ६५० जहाजे व्यवस्थापनासाठी आहेत. या जहाजांसाठी जागतिक पातळीवर इतर देशांशी स्पर्धा करू शकतील अशा दर्जाच्या भारतीय अधिकाऱ्यांची गरज होती. ती पूर्ण करण्यासाठी या कंपनीने दरवर्षी ४४० विद्यार्थी प्रशिक्षित करता येतील एवढय़ा क्षमतेची ही संस्था उभारली.

एमाचे काम भारतीय सागरी विद्यापीठ आणि भारत सरकारचे नौवहन संचालनालय यांच्या नियमनांनुसार चालते. संस्थेत जगभरात उपलब्ध असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपकरणे आणि यंत्रसामग्रीची सोय आहे. यामध्ये जहाजाच्या इंजिन रूममध्ये, डेकवर आणि व्हील हाऊसमध्ये वापरली जाणारी सर्व उपकरणे असून त्याशिवाय व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी, शिप हँडिलग सिम्युलेटर्स, इंजिन सिम्युलेटर्स टँकर मॉक-अप, वॉटर ट्रीटमेंट प्लांट अशा अनेक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा आहेत. एमामध्ये व्यावसायिक व इतर पुस्तकांनी, संगणकांनी सुसज्ज ग्रंथालयही आहे.

संस्थेच्या अध्यापकवर्गात मुख्यत: अनुभवी कॅप्टन, चीफ इंजिनीअर्स असून त्याशिवाय विज्ञान, भाषा, मानसशास्त्र इत्यादी विषयांमधील तज्ज्ञांचाही समावेश आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशिवाय सागरी जीवनाबद्दलच्या स्वत:च्या अनुभवांवर आधारित ज्ञान देऊन आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करतात. जहाजावरील अधिकारीपदांवर स्त्रियांचा सहभाग वाढविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.

एमामध्ये नाविक अधिकाऱ्यांना नॉटिकल सायन्स, मरिन इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रॉ टेक्नॉलॉजी या शाखांचे प्रशिक्षण दिले जाते. एमाचे विद्यार्थी दिवसभरात अभ्यास, प्रात्यक्षिके, मानवी मूल्ये, खेळ याशिवाय छंद आणि इतर बहि:शाल उपक्रमांमध्ये सहभागी होतात. भारत सरकारच्या नौवहन संचालनालयाने ५ एप्रिल २०२३ रोजी ‘राष्ट्रीय समुद्री दिवस’ समारंभामध्ये एमाला ‘देशातील सर्वोत्तम सागरी प्रशिक्षण संस्था’ हा पुरस्कार प्रदान केला.

कॅप्टन सुनील सुळे , मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal naval officers training institute amy
Show comments