आपल्याला ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो, तसाच तो सागरी प्राण्यांनादेखील होतो. विशेषत: सागरी सस्तन प्राण्यांना हा त्रास अधिक तीव्रतेने जाणवतो. अनेक सागरी जीव जगण्यासाठी त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात. ध्वनीचा पाण्यातील वेग १४८० मीटर प्रति सेकंद असतो. अपृष्ठवंशीय प्राणी ते महाकाय व्हेल त्यांच्या सभोवतालच्या सागरी वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी आवाजाचा वापर करतात. अशा वेळी सागरात अनावश्यक ध्वनी निर्माण होत असल्यास सागरी सजीवांच्या परस्परांशी सुरू असलेल्या संपर्कात अडथळे येतात. गेल्या २०० वर्षांत नौकानयन, औद्योगिक मासेमारी, किनारी भागांतील बांधकाम, खनिज तेल उत्खनन, भूकंप सर्वेक्षण, युद्ध, समुद्रतळालगतचे खाणकाम आणि प्रतिध्वनी आधारित उपकरणांचा वापर इत्यादींमुळे सागरी ध्वनिपातळीत वाढ झाली आहे. सागरातील ध्वनिप्रदूषणाकडे आजवर कोणी फारसे लक्ष दिले नव्हते, पण ‘साउंडस्केप ऑफ द एन्थ्रोपोसीन ओशन’ या शोधनिबंधामध्ये ‘ध्वनिप्रदूषण’ हे इतर प्रदूषणांप्रमाणेच महासागराच्या पर्यावरणासाठी हानिकारक असू शकते असे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक संशोधकांच्या चमूने सागरी ध्वनिप्रदूषण आणि त्याचा वन्यजीवांवर होणारा परिणाम या विषयावर १० हजारांहून अधिक वैज्ञानिक शोधनिबंधांचा आढावा घेतला. त्यातून समुद्रातील वाढत्या गोंगाटामुळे सागरी सजीव आणि त्यांच्या अधिवास व परिसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो, असा निष्कर्ष निघाला. यात प्राण्यांचे वर्तन, शरीर व प्रजनन यांवर विपरीत परिणाम होताना दिसला. एका प्रकाशित लेखानुसार, गेल्या ५० वर्षांमध्ये प्रमुख दर्यावर्दी मार्गावर केवळ जहाजांमुळे कमी तरंगाची वारंवारिता (फ्रीक्वेन्सी) असणाऱ्या आवाजात अंदाजे ३२ पट वाढ झाल्याचे आढळले. यामुळे सागरी प्राणी प्रजननाच्या आणि अन्न मिळवायच्या जागेपासून दूर गेले. पुलांवरील किंवा किनाऱ्यालगतच्या  विमानतळांवरील, सततच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी पाण्यात पसरतात. बंदरांची खोली वाढवण्यासाठी आणि समुद्रातील खनिज उत्खननासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान कमी तरंगांचे आवाज निर्माण करत असले तरी ते समुद्रात लांबवर पसरून जीवसृष्टीवर परिणाम करतात.

एका अहवालानुसार टाळेबंदीच्या काळात, एप्रिल २०२० मध्ये समुद्रातील ध्वनीचे सर्वेक्षण केले असता हे प्रमाण २० टक्क्यांनी कमी आढळले. तसेच पूर्वी कधी न दिसलेले सजीव सर्वेक्षणादरम्यान आढळले. यावरून मानवाने बोध सागरी ध्वनिप्रदूषण कमी केल्यास सागरी जीवसृष्टीची हानी कमी होईल.

डॉ. बाळासाहेब कुलकर्णी,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal noise pollution in the sea amy
Show comments