सागरातील अपृष्ठवंशीय मृदुकाय वर्गातील ओबडधोबड शिंपल्यांत बंदिस्त असणारी कालवं (ऑयस्टर) मानवाला प्रथिनयुक्त आहार आणि मौल्यवान मोतीही पुरवतात. भारतीय किनारपट्टीवर सापडणाऱ्या साधारण ११ प्रकारांपैकी महाराष्ट्रात क्रॅसोस्ट्रिया ग्रिफाइडिस ही खाण्यायोग्य, तर पिंक्टाडा फुकाटा ही मोती कालवांची (पर्ल ऑयस्टर) प्रजाती सापडते.
समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर चिकटलेल्या कालवांच्या कवचांवर टोकेरी कोयत्याने नेमका घाव घालून शिंपले उघडून आतील मांस काढले जाते. बऱ्याचदा कालवं चिकटलेले खडकच उचलून घरी किंवा बाजारात नेऊन हवे असतील त्या वेळी त्यांचे शिंपले फोडून आतले मांस काढले जाते. आपल्याकडे कालवं शिजवून, तळून खाल्ली जातात. शिजवल्यावर त्यातील काही महत्त्वाच्या अमिनो आम्लांचा ऱ्हास होत असल्याने परदेशातील लोक ती कच्ची खाणे पसंत करतात.
हेही वाचा >>> कुतूहल: तिसऱ्या
नैसर्गिक पर्यावरणात वाळूचा कण, शिंपल्याचा तुकडा, कचरा किंवा सूक्ष्म परजीव शिंपल्यात अडकला की आतील जीवाला तो टोचू लागतो. ती बोचणी कमी करण्यासाठी कालवाच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्राव स्रवला जातो. त्या द्रावाची पुटे त्या कणावर एकावर एक चढली जाऊन कालांतराने त्याचा मोती तयार होतो. कृत्रिमरीत्या मोती तयार करताना नियंत्रित परिस्थितीत कालवांना भूल देऊन, त्यांचे शिंपले उघडून त्यात केंद्रकाचे म्हणजेच कृत्रिम कणांचे रोपण करून शिंपला पुन्हा बंद करतात. काही काळानंतर तेथे मोती तयार होतो. हेच ते कल्चर्ड मोती. भारतात केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेतर्फे (सीएमएफआरआय) मोती संवर्धनाचे तंत्र विकसित केले गेले. तुतीकोरीन येथे याचे प्रशिक्षण मिळते.
गेल्या काही दशकांपासून अनियंत्रित बेसुमार पकड तसेच सागरी प्रदूषण यामुळे कालवांची संख्या वेगाने कमी होऊ लागल्याने त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांची शेती करणे गरजेचे ठरले. भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर अनेक ठिकाणी त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली जाते. किनाऱ्यालगत बांबूचे मांडव घालून त्यावर दोरीला लहान कालव्यांच्या शिंपा बांधून त्यांच्या माळा पाण्यात सोडल्या जातात. पुरेशी वाढ झाल्यावर ती कालवं विक्रीसाठी काढली जातात. कमी भांडवलात उत्तम नफा देणारा शेतीपूरक उद्योग म्हणून कालवांची शेती मान्यता पावत आहे. कालवांच्या कवचाचा उपयोग चुनखडी बनवण्यासाठी, औषध व पशुखाद्य निर्मितीत कॅल्शिअम पूरक म्हणून, तसेच जमिनीचा कस वाढवण्यासाठीही होतो.
– डॉ. सीमा खोत
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org