डॉ. नागेश टेकाळे, मराठी विज्ञान परिषद

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छान किती दिसते, फुलपाखरू..’ ही कविता चालीवर म्हणताना आपले लक्ष साहजिकच कवितेच्या बाजूला असलेल्या रंगीत चित्राकडे जाते ज्यामध्ये दोन मुले फुलझाडावर उडणाऱ्या फुलपाखरास पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेकांना वाटते एखाद्या सुगंधी फुलावर पंख मिटून बसलेले फुलपाखरू बोटांच्या चिमटीत पकडावे पण ते शक्य होत नाही, कारण स्पर्श होताच ते निसटून उडून जाते आणि बोटांवर राहतात ते पंखावरील सूक्ष्म रंग, असे का?

फुलपाखरांचे पंख जेवढे आकर्षक विविध रंगांचे असतात तेवढेच ते नाजूकही असतात, कारण ते कायटीन (Chitin) या विशिष्ट प्रथिनाच्या दोन पातळ थरांनी तयार झालेले असतात. याच थरांवर वनस्पतींच्या पानांवर असतात त्याप्रमाणे शिरांचे सूक्ष्म जाळे पसरलेले असते, ज्यात रक्तसदृश द्रव पदार्थ वाहत असतो. याचे मुख्य कार्य पंखांना आधार देणे एवढेच असते. प्रथिनाच्या या नाजूक थरांच्या वर आणखी एक अतिसूक्ष्म खवल्यांचा (Scales) थर असतो, ते एवढे लहान असतात की एका मिलिमीटरमध्ये त्यांची संख्या तब्बल ६०० किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते. खवल्यांची मांडणी एकमेकांवर (ओव्हरलॅप) झालेली असते. त्यांत एक किंवा अनेक प्रकारची विविध रंगद्रव्ये असतात आणि याचमुळे फुलपाखरांच्या पंखांना विशिष्ट रंगसंगती प्राप्त होते. याच खवल्यांमुळे ते अनेकवेळा कोळय़ाच्या जाळय़ातूनसुद्धा निसटून जातात, पण यामध्ये खवले नष्ट झाल्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. खवल्यांमुळेच फुलपाखराचे शरीर उबदार राहते.

फुलपाखरास चिमटीत पकडले जाते तेव्हा आपल्या त्वचेच्या तेलकट गुणधर्मामुळे हे खवले आपल्या बोटांना चिटकतात. असे खवले पुन्हा निर्माण होत नाहीत आणि त्याचा परिणाम फुलपाखरांच्या उडण्याच्या क्षमतेवर होतो. फुलपाखरांना चिमटीत कधीही पकडू नये, त्यांना बाटलीमध्ये ठेवू नये, कारण आतल्या काचेस त्यांच्या पंखांच्या धडका बसून खवले नष्ट होतात. अशी फुलपाखरे बाहेर काढली तरी ती पुन्हा उडू शकत नाहीत. फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ विशिष्ट प्रकारच्या जाळय़ा वापरतात ते याचसाठी. निसर्गातील प्रत्येक जैविक घटक सुंदर असतो फक्त त्यास दुरूनच पाहावे. त्याला पकडून त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण आपला हा आनंद अनेकदा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. 

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal picture flower tree butterfly attractive variety of colors ysh