डॉ. सुशांत सनये, मराठी विज्ञान परिषद

नळी मासे (पाइप फिश) हे सिन्ग्नाथीफॉरमिस गणातील सिन्ग्नाथीडी कुलातील असून आज जगभरामध्ये ५१ कुळांमध्ये त्यांच्या २३६ प्रजाती उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण भागामधील खाऱ्या, निमखाऱ्या तसेच गोडय़ा पाण्यात आढळतात. या माशांचे शरीर निमुळते नळीसारखे लांब, डोके शरीराच्या रेषेमध्ये असते. यांच्या नळीसारख्या लांब शरीरामुळे हे मासे बऱ्याच वेळा समुद्री गवताच्या लांब पात्यांमध्ये, समुद्री शैवालामध्ये किंवा सागरी पंखे (गॉरगोनियन) यांमध्ये मिसळत उभ्या दिशेत पोहत राहतात. विशिष्ट अधिवासांमध्ये राहणाऱ्या नळी माशांच्या शरीराचा आकार आणि रंग त्या अधिवासाशी मिळताजुळता असतो. उदाहरणार्थ, हिरव्या लांब पात्याच्या समुद्री गवतामध्ये राहणाऱ्या अ‍ॅलिगॅटर नळी माशाचा रंग हिरवा असून शरीराचा आकार चपटा लांब असतो. बरीच शारीरिक वैशिष्टय़े समुद्रघोडय़ांप्रमाणेच असून प्रजननामध्ये थोडय़ा प्रमाणामध्ये फरक दिसून येतात. नळी माशांचे नर मासे आपल्या पोटाखाली अथवा शेपटीखाली उघडय़ा अवस्थेत तात्पुरत्या कप्प्यामध्ये अंडी चिकटवतात. समुद्रघोडय़ांच्या उलट नळी माशांमधील नर एकापेक्षा अधिक माद्यांशी मीलन करतात. त्यांचे प्रजनन वर्षभर सुरू असते.

काही नळी माशांमध्ये शेपूट आधार पकडण्यासाठी बनलेली असते. काहींमध्ये शेपटाचे पर पोहण्यासाठी विकसित झालेले असतात. नळी मासे संथ गतीने पोहतात. त्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या लांब पृष्ठीय पंखाचा उपयोग पोहण्यासाठी केला जातो. लहान आकाराचे कवचधारी जीव उदा. कोपेपोड, अ‍ॅम्फिपोड, आयसोपोड, लहान जवळा इत्यादी नळी माशांचे मुख्य खाद्य आहे. यांच्या तोंडामध्ये दात नसतात, त्यामुळे ते संपूर्ण भक्ष्य गिळून टाकतात. आपल्या भक्ष्याला पाहून खाद्य शोधण्याच्या सवयीमुळे ते शक्यतो दिवसा भक्ष्य पकडतात.

भारतामध्ये सध्या १० कुळांतील नळी माशांच्या १६ प्रजाती आढळतात. यातील मायक्रोफिस डीओकाटा ही भारताच्या ईशान्य भागातील गोडय़ा पाण्याच्या प्रवाहामध्ये आढळणारी प्रजाती आययूसीएनच्या धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या ‘रेड लिस्ट’मध्ये समाविष्ट झालेली प्रजाती आहे. महाराष्ट्रात नळी माशांवर फार कमी अभ्यास झाला असून साधारणपणे यापैकी तीन कुळांमधील तीन प्रजाती (सिन्ग्नाथोईडेस बायकुलॅटस, इचथियोकॅम्पस कार्सी आणि मायक्रोफिस प्रजाती) येथे आढळतात. राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये समुद्री गवताचा अभाव हे याचे मुख्य कारण असू शकते.

Story img Loader