पुढील दहा वर्षांत प्लास्टिक प्रदूषणाने होणारे सागरी परिसंस्थेतील बदल हे येत्या १० हजार वर्षांतील सागराचे भविष्य कोलमडून पाडू शकतात. मानवजातीला याचे विनाशकारी परिणाम सोसावे लागतील. समुद्रात होणाऱ्या पाण्याच्या घुसळणीमुळे प्लास्टिकचे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म कण निर्माण होतात. असे ५.२५ ट्रिलियन कण सागरात पसरलेले आहेत. समुद्राच्या पाण्यावर २.६ चौरस किलोमीटरमध्ये (१ चौरस मैल) प्लास्टिकचे ४६ हजार तुकडे सापडतात. त्यांचे वजन दोन लाख ६९ हजार टन असावे असा अंदाज आहे. जगभरात दररोज ०.८ कोटी प्लास्टिकचे तुकडे सागरार्पण होत असतात. ३८१ दशलक्ष टन प्लास्टिक दरवर्षी समुद्रात जात असते. हीच संख्या २०३४ पर्यंत दुपटीने वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातील निम्मे प्लास्टिक एकल वापराचे आहे. तर केवळ ९ टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होतो. जगभरातल्या समुद्राचा ८८ टक्के पृष्ठभाग प्लास्टिकने व्यापलेला आहे. निरनिराळय़ा उत्पादनांत असलेल्या प्लास्टिकचे प्रमाण इतके वाढले आहे की एकदा जरी ही वस्तू पिळून काढली तर त्यातून प्लास्टिकचे १ लाख सूक्ष्म कण बाहेर पडू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कुतूहल : सागरी प्रदूषण किती, कुठे?

पूर्व प्रशांत महासागरात अमेरिकेचा पश्चिम किनारा ते हवाई बेटादरम्यान तब्बल ०.१६ कोटी चौरस किलोमीटर इतके क्षेत्र व्यापलेले प्लास्टिकच्या कचऱ्याचे महाकाय तरंगते बेट – ‘दि ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ – तयार झाले आहे. याव्यतिरिक्त उपोष्णकटिबंधातील हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागराच्या काही भागांमध्ये मोठय़ा भोवऱ्यांमध्ये कचरा साठून अशी बेटे तयार झाली आहेत. ८८ टक्के सागर-पृष्ठभाग प्लास्टिकने आच्छादित आहे. दर मिनिटाला जगभरात १० लाख प्लास्टिक पिशव्या कचऱ्यात टाकल्या जातात. ‘आकाशात पतितं तोयम् यथा गच्छति सागरम्’ या उक्तीप्रमाणे प्लास्टिकचा कचरा कुठेही टाकला तरी त्याचे अंतिम गंतव्य स्थान हे समुद्र आणि महासागर हेच आहे. या प्लास्टिकचा सागराच्या परिसंस्थांवर गंभीर  परिणाम होतो. प्लास्टिकच्या वस्तू वजनाने हलक्या असल्यामुळे हवेच्या झोताबरोबर व अन्य कारणाने आसपासची गटारे, त्यातून थेट नद्या, खाडी आणि शेवटी समुद्रात हा कचरा वाहून जातो. शिवाय असा कचरा थेट खाडय़ा व समुद्रात टाकणाऱ्या महाभागांची संख्यादेखील काही कमी नाही.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org