दीडशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये व्यापारी नौवहन खूप मोठय़ा प्रमाणावर प्रगत झाले होते. अनेक युरोपीय देशांनी जगभर आपल्या वसाहती निर्माण केल्या आणि तिथे त्यांचा सागरी व्यापार सुरू होता. शिडांच्या जहाजांच्या जोडीला आगबोटीसुद्धा मालवाहतुकीसाठी वापरण्यात येऊ लागल्या होत्या. प्रत्येक जहाजावरून हजारो टन मालाची ने-आण होत होती. ‘सागरी विमा’ ही संकल्पना अस्तित्वात येऊन एक शतक उलटून गेले होते, त्यामुळे जहाजावरच्या मालाचा विमा उतरवलेला असायचा. जहाज बुडून सगळा माल तळाला गेला तरी व्यापऱ्याला नुकसानभरपाई मिळत असे. थोडक्यात हा काळ जहाज मालक आणि व्यापारी यांच्या दृष्टीने सुखासमाधानाचा आणि भरभराटीचा होता, दु:खी होते ते फक्त दर्यावर्दी. जास्तीत जास्त नफा कमावण्यासाठी जहाजावर अवाचेसव्वा माल लादून ते समुद्रात पाठवून द्यायचे. ‘पार गेला तर नफा, नाही गेला तर विमा’ अशी पद्धत सुरू झाली.
स्वत: गरिबीतून वर आलेल्या प्लिमसोल यांना खलाश्यांच्या जिवाशी चाललेला हा खेळ सहन झाला नाही आणि त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये या विषयाला वाचा फोडली. त्यांना तत्कालीन पंतप्रधान बेंजामीन डिझराएलीसह अनेकांनी कडाडून विरोध केला. तरीही त्यांनी हा लढा नेटाने सुरू ठेवला आणि १८७३ साली (म्हणजेच बरोबर १५० वर्षांपूर्वी) ब्रिटिश सरकारने एक आयोग नेमला आणि या विषयाचा सखोल अभ्यास करून १८७६ साली केलेल्या कायद्यानुसार प्रत्येक जहाजाच्या दोन्ही बाजूंना एक रेष आखली जाते. जहाजात माल भरताना ही रेषा पाण्याखाली गेल्यास तो एक गुन्हा ठरतो. या रेषेला प्लिमसोल साहेबांच्या सन्मानार्थ आजही ‘प्लिमसोल रेषा’ म्हणून ओळखतात.
या रेषेबरोबरच इतरही काही खुणा जहाजाच्या बाजूंवर केलेल्या असतात. या रेषा जहाजाचा किती भाग पाण्यावर राहिला पाहिजे (फ्री बोर्ड) ते दर्शवितात. फ्रीबोर्ड जेवढा जास्त तेवढी जहाजाची तरण क्षमता (रिव्हर्स बॉयन्सी) जास्त. वेगवेगळय़ा ऋतूंमध्ये समुद्र किती शांत किंवा खवळलेला असतो याचा विचार करून या रेषांचे स्थान निश्चित करतात. या रेषा मिळविण्यासाठी जहाज सर्वपरीने सुस्थितीत असावे लागते. थोडक्यात, लाखो दर्यावर्दी आजही सुखरूपपणे समुद्रसफरी करीत असतात ते प्लिमसोल साहेबांनी दीडशे वर्षांपूर्वी आखलेल्या या लक्ष्मण-रेषेमुळे!
कॅप्टन सुनील सुळे, मराठी विज्ञान परिषद