पृथ्वीभोवती साधारण १२ ते ५० किलोमीटरच्या पट्टय़ात असणारा थर म्हणजे स्थितांबर. स्थितांबरात ओझोन वायूचा थर असतो. ऑक्सिजनच्या तीन अणूंनी बनलेला अतिक्रियाशील वायू म्हणजे ओझोन! ओझोनचा थर आपले संरक्षक कवच आहे. सूर्याच्या प्रारणातील जंबुलातीत किरण (अल्ट्राव्हायोलेट रे) ओझोनच्या थरात बहुतांश प्रमाणात शोषले जातात. तसे न होता जर हे किरण आपल्यापर्यंत पोहोचले तर त्वचेचा कर्करोग, मोतिबिंदू, प्रतिकारशक्तीचा ऱ्हास होण्याची भीती असते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांना १९६९ मध्ये प्रथमच लक्षात आले. हवेतील ऑक्सिजनचे मुक्त अणू आणि नायट्रोजन ऑक्साईड यांच्या प्रक्रिया चक्रामुळे ओझोनचा ऱ्हास होतो, असे त्या वेळी संशोधनातून पुढे आले. त्यानंतर अनेकांच्या संशोधनातून कळले की मानवनिर्मित कार्बन, फ्लोरिन, ब्रोमिन व त्यांची संयुगे (क्लोरोफ्ल्युरोकार्बन्स) यामुळे स्थितांबरातील ओझोनचे प्रमाण कमी होते. प्लास्टिक उद्योग, रेफ्रिजरेटर्स, वातानुकूलन यंत्रे, स्प्रे इत्यादींमुळे वातावरणात क्लोरेफ्ल्युरोकार्बन्सचे उत्सर्जन होते. थोडक्यात आधुनिक मानवाचा प्रगत विज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर हे यामागचे एक प्रमुख कारण आहे, असे आपण म्हणू शकतो. ध्रुव प्रदेशाच्या आजूबाजूच्या प्रदेशात ओझोन थराचा सर्वात जास्त ऱ्हास झालेला आढळतो.
‘ओझोन गळती’ किंवा ‘ओझोन थरातील छिद्र’ म्हणजे असा पातळ होणारा ओझोनचा थर. ध्रुव प्रदेशावर ओझोनच्या थरात सर्वात जास्त घट झालेली आढळते. वसंत ऋतूदरम्यान इतर ठिकाणांपेक्षा ध्रुव प्रदेशावरील ओझोनचे प्रमाण जवळपास ६० टक्क्यांनी कमी असल्याचे १९७०च्या दशकाच्या शेवटी शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. हिवाळय़ात ध्रुव प्रदेशावर स्थितांबरातील तापमान अतिशय कमी असते. परिणामी ध्रुव प्रदेशावर हिवाळी भोवरा तयार होतो. या भोवऱ्याच्या आत साधारण १२ ते २२ किमी उंचीवर ढग तयार होतात. या ढगांतील रासायनिक प्रक्रियांमुळे क्लोरिन/ ब्रोमिनचे अणू त्यांच्या संयुगांपासून विलग होतात. वसंतऋतूत सूर्यप्रकाश मिळाल्यावर हे क्लोरिन/ ब्रोमिनचे अणू ओझोनबरोबरच्या प्रक्रियेतून ओझोनचे विघटन करतात. ओझोन नाशाचे प्रमाण उत्तर ध्रुवापेक्षा दक्षिण ध्रुव प्रदेशावर जास्त असते. ओझोन पातळीचे रक्षण करण्यासाठी सर्व देश एकत्र आले. १९८७च्या मॉन्ट्रियल करारनाम्यात ओझोनला धोकादायक असणाऱ्या घटकांच्या वापराचे प्रमाण कमी करण्याचे ठरवण्यात आले. याचा परिणाम म्हणून ओझोन गळतीचे प्रमाण हळूहळू कमी होऊन २०६० सालापर्यंत ओझोनचे प्रमाण पूर्ववत होईल, अशी अपेक्षा आहे. ओझोन वायूच्या संवर्धनासाठी आणि त्याविषयी लोकजागृतीसाठी १६ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
– डॉ. सुभगा कार्लेकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org