अनघा शिराळकर, मराठी विज्ञान परिषद
रचनात्मक भूगर्भ शास्त्रज्ञ (स्ट्रक्चरल जिऑलॉजिस्ट) प्रा. सुदीप्ता सेनगुप्ता यांचे कॅम्ब्रियन खडकांच्या निर्मितीबाबतचे संशोधन प्रसिद्ध आहे. १९८३ सालच्या भारताच्या तिसऱ्या मोहिमेअंतर्गत अंटाक्र्टिकावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांपैकी त्या एक आहेत. संशोधन कार्याबरोबरच ‘दक्षिण गंगोत्री’ हे अंटाक्र्टिकावरील पहिले भारतीय संशोधन केंद्र स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता.
प्रा. सुदीप्ता यांचे मोहिमेतील अंटाक्र्टिकावरील शिरमाचर या टेकडीचे भूगर्भशास्त्रीय संशोधन मूलभूत व अतिमहत्त्वाचे होते. त्याचा उपयोग प्राचीन काळातील हवामानाचा अभ्यास करून भविष्यातील हवामानाचे भाकीत करण्यासाठी होतो.
लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील भूखंड एकसंध होता. कालांतराने त्याचे तुकडे झाले आणि जगाचा नकाशा बदलत राहिला. या तुकडय़ांपैकी सर्वात मोठय़ा तुकडय़ाचे नाव आहे ‘गोंडवन’. सुमारे १० लाख वर्षांपूर्वी याचेही छोटे तुकडे होऊन अफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटाक्र्टिका हे भूप्रदेश तयार झाले. भारत व अंटाक्र्टिका हे प्राचीन गोंडवनाचा भाग असल्याने पूर्व अंटाक्र्टिकावरील खडक व दक्षिण भारतातील खडक यांच्यात साधम्र्य आढळते. प्रा. सुदीप्ता यांचे अंटाक्र्टिकावरील संशोधन हे या विषयातील पुढील संशोधनासाठी मार्गदर्शक ठरले. प्रा. सुदीप्ता यांनी १९८९ साली नवव्या अंटाक्र्टिका मोहिमेत भाग घेतला आणि गोंडवनावर संशोधन केले.
प्रा. सुदीप्ता यांनी कोलकाता येथील जादवपूर विद्यापीठातून भूगर्भशास्त्र या विषयात बी.एस्सी. व एम.एस्सी. केले, नंतर रचनात्मक भूगर्भशास्त्र या विषयात १९७२ साली पीएच.डी. केली. १९७३ सालापासून ब्रिटन सरकारच्या ‘रॉयल कमिशन फॉर जिऑलॉजीच्या शिष्यवृत्ती’अंतर्गत तीन वर्षे लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमध्ये संशोधन केले. त्यानंतर स्वीडनमधील उप्पसाला विद्यापीठात अध्यापन संशोधन करून १९७९ साली भारतात परत आल्या आणि वरिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ म्हणून त्या ‘जिऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया’मध्ये रुजू झाल्या. १९८२ ते २००६ या कालावधीत निवृत्तीपर्यंत त्यांनी जादवपूर विद्यापीठात भूगर्भशास्त्राचे अध्यापन केले.
प्रा. सुदीप्ता यांचे अनेक वैज्ञानिक लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय ‘शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड’, ‘फेलो ऑफ इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’, ‘नॅशनल मिनरल अवॉर्ड’, ‘अंटाक्र्टिका अवॉर्ड’ इत्यादींसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या प्रा. सुदीप्ता सेनगुप्ता मानकरी आहेत.