डॉ. नंदिनी विनय देशमुख
वलयी प्राणिसंघातील गांडूळ आपल्या परिचयाचा आहे. परंतु समुद्रात असणाऱ्या असंख्य प्रकारच्या वलयींबाबत आपण अनभिज्ञ असतो. परापाद असणाऱ्या ‘पॉलिकीट’ प्रकारच्या वलयी प्राण्यांपैकी काही पोहू किंवा सरपटू शकतात, तर काही कायमच नळय़ांसारख्या घरात राहतात. ज्या किनाऱ्यांवर चिखल आणि वाळू यांचे मिश्रण असते, अशा ठिकाणी आजूबाजूच्या तुटक्या शंखांच्या छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांतून, तसेच इतर कचऱ्यातून नळय़ा तयार करून त्यांत वलयी राहतात. यातील काही नळय़ा मीटरभर लांब आणि १० ते १५ सेंटिमीटर रुंद असतात. नळीचा बहुतेक भाग समुद्रात खुपसलेला आढळतो. साधारण पन्नास वर्षांपूर्वी दादर चौपाटीवर अशा वलयी प्राण्यांच्या नलिका मोठय़ा प्रमाणात दिसत.
या नळय़ांत १० ते १५ सेंटिमीटर लांबीचा प्राणी सतत त्याची शुंडके हलवत असतो. आकुंचन- प्रसरण करून आजूबाजूच्या वाळूचे कण टिपून स्वत:ची नलिका-घरे हे सतत दुरुस्त करत असतात. गांडुळाप्रमाणे हे सागरी जीवदेखील जेथे राहतात तेथील चिखल व माती गिळत असतात आणि सतत शरीराबाहेर फेकत असतात, त्यामुळे त्यांच्या आसपास मातीचे चिमुकले गठ्ठे आढळतात. प्राणिशास्त्रज्ञांच्या जाणकार नजरेस यावरूनच हे जीव नक्की कोठे आहेत हे समजते. आरेनीकोला किंवा लगवर्म हा त्यामानाने दुर्मीळ असणारा वलयी हाजी अलीच्या परिसरात सापडत असे. साधारण २५ सेंटिमीटर लांब हिरवट खाकी रंगाचा, दणकट असा हा किडा इंग्रजी यू अक्षराच्या आकाराच्या बोगद्यात घर करून राहतो. त्याचाच भाईबंद ‘कीटॉपटेरेस’ कायमच बिळात राहतो. दुसऱ्या कोणत्याही प्राण्याच्या नजरेस पडत नाही, मात्र त्याच्या शरीराला कुठेही स्पर्श झाल्यास तो भाग तेज:पुंज होतो. अधिक उत्तेजित झाल्यास संपूर्ण शरीरच प्रकाशमान करतो.
यापैकी फॅनवम्र्स (‘सॅबिलिड’ व ‘सप्र्युलीड’) नावाचे प्राणी समुद्रजलापासून कॅल्शिअम काबरेनेट शोषून घेऊन त्यापासून स्वत:च्या नलिका तयार करतात. पांढऱ्या किंवा गुलाबीसर रंगांच्या सप्र्युलीडची घरे वळणावळणांच्या नलिका असतात. यांना ‘ख्रिसमस ट्री वम्र्स’ असेही नाव आहे. तर सॅबिलिडच्या नलिका सरळ असून त्यांच्या डोक्यावर पंख्याप्रमाणे दिसणारे अवयव असतात. तलस्थ जीवांपैकी एकतृतीयांश असणारे हे प्राणी समुद्रतळात झिरपणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण आणि विघटक जिवाणूंची संख्या वाढवतात.