डॉ. स्मिता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समुद्रकाठावर अगदी सहजपणे आढळणारी वनस्पती म्हणजे केतकी (केवडा). केवडय़ाचे बन म्हणूनही ही वनस्पती ओळखली जाते. हलक्या मोकळय़ा वाळूच्या कणांमध्येदेखील या वनस्पतीची मुळे घट्ट रोवलेली असतात. या मुळांमुळे वाळूची धूप नैसर्गिकपणे थांबवली जाते. या उंच वाढणाऱ्या झाडांच्या आडव्या फांद्यांवर व खालच्या खोडावर काही आधार देणारी आगंतुक मुळे आढळतात. या आधारी मुळांच्या टोकावर वाढणाऱ्या अग्रभागांचे संरक्षण करणाऱ्या अनेक पातळ पापुद्रय़ांसारख्या टोप्या आढळतात. लांब व काटेरी कडा असणाऱ्या या झाडाच्या पानांचा वापर पुष्परचनेत करतात. या झाडाला लांब पांढऱ्या फुलांचे तुरे साधारणपणे श्रावण व भाद्रपद महिन्यांत येतात. फुलांना मंद सुगंध येतो, म्हणून यापासून अत्तर तयार करतात. उदबत्तीमध्ये तसेच काही अन्नपदार्थात केवडय़ाचे पाणी वापरले जाते. गणपतीच्या पूजेसाठी या फुलांचा वापर होतो. 

साधारणपणे मध्यम आकाराची, पोपटी रंगाची पाने असणारी, खूप फांद्या असणारी करंजाची झाडे किनाऱ्याजवळ आढळतात. त्यांची फुले लहान, पांढऱ्या रंगाची, लोंबणाऱ्या गुच्छामध्ये येणारी पाच पाकळय़ांची असतात. फळे चपटी, थोडीशी फुगीर आणि करंजीच्या आकाराची असतात. याच्या बियांपासून मिळणारे अखाद्य तेल इंधन म्हणून वापरतात. शिवाय यापासून बायोडिझेल तयार केले जाते. या तेलाचे काही औषधी उपयोगही आहेत. समुद्रफळ (निवार) हा मध्यम उंचीचा वृक्ष आहे. मोठय़ा आकाराची, एकाआड एक असलेली पाने, मोठय़ा आकाराची, साधारण पांढरी, गुलाबी रंगाचे भरपूर पुंकेसर असणारी फुले ही एकसारखी मोठी असतात. या झाडांच्या सालीचा व फळांचा औषधी उपयोग आहे. शेतीची अवजारे, पेटय़ा, प्लायवूड तयार करण्यासाठी या झाडाचे लाकूड वापरले जाते.

भेंड हे झाड मध्यम ते उंच वृक्ष या स्वरूपात समुद्रकिनाऱ्याजवळ आढळते. या झाडाला खूप पसरलेल्या फांद्या, लांब देठाची, हृदयाच्या आकाराची पाने आणि मोठय़ा देठाची पिवळी फुले असतात. फळेसुद्धा लांब देठाची, गोलसर आकाराची असून ती गौरीच्या पूजेसाठी आणि नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वापरतात. वजनाने हलक्या असणाऱ्या या लाकडापासून पूर्वी बाटल्यांसाठी झाकणे तयार केली जात. तसेच कोरीवकामासाठी, वाद्ये बनविण्यासाठीही हे लाकूड वापरले जाते. झाडाची साल, पाने, फळे यांचा औषधी वापर होतो.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal sea beach plant kevada roots naturally stopped sand erosion ysh
Show comments