शेवंड हा एक अपृष्ठवंशीय संधिपाद जलचर आहे. कोळंबीसारखा दिसणारा पण आकाराने बराच मोठा असणारा शेवंड म्हणजेच पंचतारांकित रेस्टॉरन्ट्समध्ये मिळणारा लॉब्स्टर. जगभरात सर्वात महागडे लोकप्रिय सागरी खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवंडांपासून अमेरिकेतील मेन या प्रांतातील उपाहारगृहांत ‘लॉब्स्टर आइसक्रीम’ही तयार केले जाते. शेवंडात मोठय़ा प्रमाणात प्रथिने असतात. युरोप आणि अमेरिकेत रेड लॉब्स्टर नावाची उपाहारगृहे साखळी पद्धतीने चालवली जातात.
सतराव्या शतकापासून याची मासेमारी केली जाते. शेवंड हे दिवसभर खडकांच्या फटीत किंवा चिखलात बिळे करून राहतात व रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात, त्यामुळे त्यांची मासेमारी ही सूर्यास्तानंतर केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली किंमत मिळू लागल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही त्यांचा भाव वधारला आहे, पण यामुळे त्यांची मोठय़ा प्रमाणात अशाश्वत धरपकड सुरू आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : मोत्यांची निर्मिती!
शेवंडाच्या १२ प्रजाती भारतीय किनारपट्टीवर आढळतात. त्यापैकी केवळ सहा ते सात प्रकारच्या शेवंडांनाच व्यापारीदृष्टय़ा महत्त्व असते. त्यांचे काटेरी आणि बिनकाटेरी असे दोन प्रकार असतात. सर्वसाधारणपणे २० ते २५ सेंमीपासून ५० सेंमीपर्यंत वाढणारे शेवंड मातकट, काळसर रंगाचे तर काही हिरवट, नारिंगी, जांभळट रंगाचे असतात. त्यांच्या शरीराचे शिरोवक्ष व उदर असे दोन भाग असतात. संपूर्ण शरीरावर कडक कायटीनचे आवरण असते. सुलभ हालचालींसाठी कवचाची खंडित वलये, पातळ व लवचीक पटलांनी एकमेकांना जोडलेली असतात. शिरोवक्षावर पाच तर उदरावर आठ उपांगांच्या जोडय़ा असतात. प्रचलन व अन्नग्रहण करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. हे खादाड प्राणी असून लहान मासे, मृदुकाय प्राणी, पाणवनस्पती, समुद्रतळाशी कुजलेले मांस अशांचे भक्षण करतात.
हेही वाचा >>> कुतूहल : मोती देणारी कालवं
मादी साधारण पाचव्या वर्षी जननक्षम होऊन अंडी घालण्यासाठी खोल पाण्यात जाते. एक मादी साधारणपणे एका प्रजनन काळात दोन ते तीन लाख अंडी घालते. बीजांडकोशातून बाहेर पडलेली अंडी मादीच्या पुच्छपादाच्या आतील भागास फलन होईपर्यंत चिकटून राहतात. नराचे शुक्राणू बाहेर पडून फलन होईपर्यंत अंडी मादी सांभाळते. अशा अंडी चिकटलेल्या माद्या जाळय़ात सापडल्यास त्यांना पुन्हा पाण्यात सोडून देऊन शेवंडांचे संवर्धन केले पाहिजे. कारण शेवंडांच्या अनिर्बंध मासेमारीने त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. आता शेवंड-शेतीदेखील करण्यात येते.
– डॉ. सीमा खोत
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org