मुशी, मोरी म्हणजेच शार्क मासे सागरी ‘कूर्चामीन’! त्यांचा अंत:कंकाल कूर्चाचा असतो. वेगाने पोहणारे, मध्यम ते महाकाय बहुसंख्य शार्क शिकारी, मांसभक्षक असतात. त्यांच्या खरखरीत त्वचेवरील खवले स्पष्ट दिसत नाहीत. याउलट ‘अस्थिमीन’ प्रकारच्या माशांचे खवले सहज दिसतात. शार्कचे खवले वेगळय़ा प्रकारचे, अगदी बारीक असतात. त्यांना ‘प्लॅकॉइड स्केल्स’ म्हणतात. शार्कच्या कातडीवरून बोट फिरवले की बारीक काटय़ांसारखे खवले जाणवतात. बोट शार्कच्या डोक्याकडून शेपटीकडे नेले तर खवले टोचत नाहीत. पण उलट दिशेने शेपटीकडून डोक्याकडे नेले तर खवले खुपतात. बोट उलट दिशेने फिरवल्यास शार्कची त्वचा पॉलीश पेपरसारखी खरखरीत लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शार्कचे प्लॅकॉइड खवले त्वचेच्या आतल्या थरात शंकरपाळय़ाच्या आकाराच्या पट्टीवर बसलेले असतात. खवल्याचा उभा टोकेरी भाग शार्कच्या मागच्या म्हणजे शेपटीच्या दिशेने वळलेला असतो. जुन्या काळच्या घरांवरील कौलांप्रमाणे खवले समांतर रांगांत खेटून बसवलेले असतात. ते आपल्या मागच्या-पुढच्या खवल्यांचा काही भाग झाकतात. ‘प्लॅकॉइड’ शब्दाचा अर्थ आहे ‘प्लेट-सारखा’. शार्कचे प्लॅकॉइड खवले आणि त्यांचे दात यांची वाढ व अंतर्रचना एकसमान असते. शार्कच्या खवल्यांपासून त्यांच्या तोंडातील दातांच्या रांगा बनतात. त्यामुळे जितक्या वेळा दात पडतात तितक्या वेळा ते नव्याने उगवतात. आपल्याला दातांचे दोन संच असतात. दुधाचे दात पडले की नवा संच येतो. तो अंतिम संच असतो. तो पडल्यावर कृत्रिम दात लावावे लागतात. शार्कच्या दातांत मऊ दंतमज्जा, त्यावर दंतीनचे टोपण, दाताच्या वरच्या बाह्यभागात अतिकडक एनॅमलचे आवरण असते.

मासे असोत की सरडय़ांसारखे प्राणी, खवले हा त्यांचा बाह्यकंकाल- बाहेरचा सांगाडा असतो. माशांच्या आणि सरीसृप वर्गातल्या खवल्यांत रचनात्मक फरक असतो. शार्कच्या असंख्य सूक्ष्म, लवचीक, कोलॅजेनच्या तंतूंनी तळाशी जखडलेल्या खवलेधारी त्वचेचा शार्कना वजनाला हलक्या पण मजबूत, चिवट चिलखतासारखा फायदा होतो.

खवल्यांच्या विशिष्ट रचनेमुळे शार्कना पोहताना पाण्याचा फारसा विरोध होत नाही. कातडीवर जिवाणू टिकत नाहीत की शेवाळे अडकत नाही. त्यामुळे जिवाणू, बुरशी यांच्या वसाहती त्वचेवर वाढू शकत नाहीत. शार्क मासे गेली ३५ कोटी वर्षे जीवनसंघर्षांत टिकून आहेत. या उत्क्रांतीत शार्कच्या प्लॅकॉइड खवल्यांचा आणि त्वचेचा मोठा वाटा आहे.-नारायण वाडदेकर,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal shark scales the scales on the rough skin of sharks are not visible amy
Show comments