डॉ. राजीव भाटकर
डय़ूगाँगची एक व मॅनाटीच्या तीन अशा चार प्रजाती सायरेनिया सागरी सस्तन प्राण्यांच्या तर सी-ऑटर आणि ध्रुवीय अस्वले हे दोघे सागरी फिसीपीडिया या गणात वर्गीकृत केले जातात. पूर्वीचे खलाशी लोक मॅनाटी या प्राण्याला पाहून त्या जलपरी (मर्मेडस) आहेत असे समजायचे. त्यावरूनच ‘सायरेनिया’ हे नाव आले.
डय़ूगाँग व मॅनाटीची शरीरे डोक्याकडे फुगीर, मध्यभागी दंडगोलाकार व शेपटीकडे निमुळती होत जातात. पाणमांजराचे शरीर तसेच पण अक्षीय आहे. छोटे डोके, पंजा आणि नखे असलेले आखूड आणि दणकट बाहू ही यांची लक्षणे. ध्रुवीय अस्वलांच्या पूर्ण शरीरावर पांढऱ्या केसांचा थर असतो त्यामुळे ते हिमाच्छादीत प्रदेशात मिसळून जातात आणि शिकार करताना बेमालूमपणे भक्ष्याजवळ पोहोचू शकतात. डय़ूगाँग व मॅनाटी उष्ण विषुववृत्तीय प्रदेशातील किनारपट्टीवर तर पाणमांजर उत्तर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावरील समशीतोष्ण हवामानात राहतात. ध्रुवीय अस्वले केवळ उत्तर ध्रुवीय प्रदेशातच आढळतात.
डय़ूगाँग व मॅनाटी पाण्याखाली संथपणे वावरतात व समुद्रतळावर उगवलेले शैवाल, पाणगवत इत्यादी खातात, म्हणूनच त्यांना ‘समुद्री-गायी’ म्हणतात. भारतात केरळ किनारपट्टीजवळ समुद्र शेवाळाच्या आश्रयाने समुद्र गायी आढळतात. पाणमांजर पाण्याच्या पृष्ठभागावर उलटे झोपून आपल्या छातीवर एखादा दगड ठेवतात व शिंपले त्यावर आपटून फोडून खातात. ध्रुवीय अस्वले प्रामुख्याने सीलची शिकार करतात तसेच रेनडियर, पाणपक्षी, मासेही खातात. ५ वर्षे वयाची मॅनाटी प्रजननक्षम होते. त्यांचा पुनरुत्पादनाचा कालावधी दोन ते पाच वर्षांनी एक पिल्लू असा आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढण्यास वेळ लागतो. सी-ऑटर दरवर्षी एक पिल्लू तर ध्रुवीय अस्वले दर तीन वर्षांतून एकदा दोन ते तीन पिल्ले प्रसवतात.
नष्ट होणारे अधिवास तसेच मोठय़ा बोटींची धडक यामुळे मॅनाटीचा नाश होतो. १८ व्या शतकात ‘स्टेलर्स सी-कॉऊ’ नावाची मॅनाटीची एक प्रजाती मानवाने केलेल्या शिकारीमुळे नामशेष झाली. ध्रुवीय अस्वलांवर जागतिक तापमानवाढ, समुद्री खनिज उत्खनन आणि व्यावसायिक नौकानयनाचा प्रतिकूल परिणाम होतो. या सागरी सस्तनींच्या गटांकडे जगाचे लक्ष वेधले जावे म्हणून जागतिक स्तरावर २७ फेब्रुवारी ‘ध्रुवीय अस्वल दिन’ व २८ मे ‘डयूगाँग दिन’ पाळले जातात.