सुप्तावस्थेतील बीज, पोषक वातावरणात तरारून उठते तसेच काहीसे डॉ. विशाल भावे यांच्या सागरी विज्ञानप्रेमाबद्दल म्हणता येईल! समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरीसारख्या नगरात राहत असल्यामुळे समुद्राविषयी कायमच विशेष ओढ असलेला हा तरुण त्याच्या सागरी संशोधनाच्या क्षेत्रात मुसंडी मारून सागरी जैवविविधतेचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक बनला.
लहानपणी शाळेत असल्यापासून चौकस वृत्तीमुळे किडे, मासे पकडून त्यांचे निरीक्षण करण्याची सवय त्यांना लागली आणि त्यातून संशोधनाची गोडी निर्माण झाली. रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयात ‘मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान’ हा विषय कनिष्ठ महाविद्यालयात आणि प्राणीशास्त्र हा विषय पदवीसाठी शिकताना त्यांची सागरी जीवशास्त्राशी ओळख झाली. २००४ साली भाटय़े खाडीवरील संशोधन प्रकल्पात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच संशोधनाची दिशा पक्की झाली. मुंबईच्या कीर्ती कॉलेजमधून समुद्रशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली. यानंतर ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’त काम करत असताना या संस्थेचे रत्नागिरी येथे संशोधन केंद्र उभारण्याची मोठी संधी मिळाली. रत्नागिरी आणि आजूबाजूच्या किनाऱ्यांवरील जैवविविधतेचा विशेषत: समुद्र गोगलगायींची नोंद व अभ्यास करताना जवळजवळ ८० विविध प्रकारच्या प्रजाती त्यांना आढळून आल्या. यापैकी कित्येक प्रजाती भारतात प्रथमच सापडल्या तर काही नव्या प्रजातींचीही नोंद करण्यात आली. यांतील ४ नवीन प्रजाती त्यांच्या नावावर नोंदल्या गेल्या आहेत. या त्यांच्या विशेष कार्यासाठी त्यांना २००९ मध्ये सेंच्युरी आरबीएस अवार्डसतर्फे ‘यंग नॅचरलिस्ट’ आणि अलीकडेच ‘दै. तरुण भारत’ यांचा ‘तरुण संशोधक’ पुरस्कार त्यांना मिळाले.
डॉ. भावे यांचे विविध सागरी जीवशास्त्रासंबंधी २० शोधनिबंध आणि ८ तांत्रिक अहवाल विविध प्रख्यात विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील समुद्रजीवांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असे ‘महाराष्ट्राची सागरी संपदा’ ही मराठीतील मार्गदर्शक पुस्तिका त्यांनी लिहिली. भौगोलिक माहिती प्रणाली, दूरस्थ संवेदन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांच्या अधिवासांचे जतन करण्यावर त्यांचा भर आहे. सध्या ‘सृष्टी कॉन्झर्वेशन फौंडेशन’या संस्थेत सहसंचालक म्हणून कार्य करताना लक्षद्वीपमधील प्रवाळभित्तिकांचे संरक्षण, ‘निसर्ग’ व ‘तोक्ते’ चक्रीवादळांपासून सागर किनाऱ्यांच्या संरक्षणामध्ये कांदळवनांची भूमिका याचा अभ्यास करण्यात ते व्यस्त आहेत.