त्सुनामी म्हणजे समुद्राखालील तीव्र भूकंप, स्फोट किंवा ज्वालामुखी यांच्यामुळे उद्भवणाऱ्या तीव्र लहरींची मालिका. ‘त्सुनामी’ हा शब्द जपानी भाषेतला असून त्याचा अर्थ ‘बंदरावरील लाटा’ असा आहे. खोल समुद्रात त्सुनामीच्या लहरी या जेट विमानाच्या वेगाने म्हणजे ताशी ८०० किलोमीटर प्रवास करतात. निर्माण होणाऱ्या लाटा प्रचंड प्रमाणात, विलक्षण उंचीच्या आणि विध्वंसक असतात. किनाऱ्यावर पोहोचल्यावर या लाटा त्यांच्या तीव्रतेने आणि उंचीने समुद्रकिनाऱ्यावरील मनुष्यवस्ती पूर्णपणे उद्ध्वस्त करतात. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल : सागर किनाऱ्यांची स्वच्छता

मागील दोन दशकांत आलेल्या त्सुनामी अतितीव्र स्वरूपाच्या होत्या. हिंदी महासागरात २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या ९.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या त्सुनामीमुळे सुमात्रा, इंडोनेशिया, अंदमान, थायलंड, श्रीलंका, मालदीव इत्यादी बेटांवर आणि दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणात मनुष्य व वित्तहानी झाली होती. पॅसिफिक महासागरात २७ फेब्रुवारी २०१० रोजी ८.८ रिश्टर स्केलची चिली देशातील मौले प्रदेशातील त्सुनामी आजूबाजूच्या देशांनाही हानी पोहोचवणारी ठरली. ११ मार्च २०११ रोजी पश्चिम पॅसिफिक महासागरात ईशान्य जपानमधील ९ रिश्टर स्केलच्या सेंडाई त्सुनामीमुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात मनुष्य व वित्तहानी झाली आणि अणुऊर्जा निर्मिती करणाऱ्या भट्टीचेही नुकसान झाले. २८ सप्टेंबर २०१८ रोजी इंडोनेशियामधील पालु, सुलावेसी येथे ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्सुनामी झाली. या दोन्ही आपत्तींमुळे फार मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. २२ डिसेंबर २०१८ रोजी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेल्या सुंदा स्ट्रेट त्सुनामीने जावा, सुमात्रा व इंडोनेशिया या बेटांचे प्रचंड नुकसान झाले. या त्सुनामीमुळे १ ते १३ मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या.

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्रासंदर्भातील शाश्वत विकास ध्येय

जपानमधील कोणत्याही भागातील भूकंप व त्सुनामीच्या लहरींचा तपास लागून त्यांची नोंद होऊन एका यंत्रणेद्वारे सर्व प्रसारमाध्यमांमार्फत भूकंप व त्सुनामीबद्दलची आगाऊ माहिती देशभर पुरवली जाते. त्यामुळे प्रशासन व जनतेला बचावाच्या तयारीसाठी वेळ मिळतो. भारतातील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॉयडा येथील राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र आणि हैदराबाद येथील भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र अशा प्रकारची सेवा देशाला पुरवते. तसेच ‘इंडिया क्वेक’ नावाचे एक मोबाइल फोनमधील अ‍ॅप जनतेला उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kutuhal the most destructive tsunamis in history zws