संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ साली घोषित केलेल्या शाश्वत विकासाच्या ध्येयांपैकी चौदावे ध्येय हे पाण्याखालील जीवनाचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी मांडले गेले. एकूण १७ ध्येये ठरवण्यात आली आहेत, त्यातील क्रमांक १३, १४ आणि १५ ही पर्यावरण रक्षणासाठीची आहेत. तेरावे ध्येय हवामान बदलांचा वेग कमी राखणे हे आहे. तर पंधराव्या ध्येयात जमिनीवरच्या जीवांची जपणूक हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात वनांचा नाश थांबवणे हे प्रमुख ध्येय आहे. २०३० पर्यंत ही ध्येये साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला होता. परंतु, मध्यंतरी आलेल्या कोविडच्या संकटामुळे ही कालमर्यादा आता काहीशी बदलली आहे.
हेही वाचा >>> कुतूहल : समुद्रात भराव घालण्याच्या पद्धती
समुद्र संपदेचा शाश्वत पद्धतीने विनिमय व्हावा हे चौदाव्या ध्येयाचे उद्दिष्ट होते. यामध्ये सागरी प्रदूषणास आळा घालणे, समुद्रजलाचे आम्लीकरण थांबवणे, अतिमासेमारीस बंदी, सागरी आणि किनारी परिसंस्था सुरक्षित ठेवून त्यांचे संवर्धन करणे इत्यादींचा समावेश आहे. समुद्र अनेकांची भूक भागवतो, रोजगाराच्या संधी उत्पन्न करून देतो आणि कार्बन शोषणाचे महत्त्वाचे कार्य करतो. समुद्रातील जीवांवर बदलत्या हवामानाचा आणि विशेषत: जागतिक तापमानवाढीचा खूप प्रभाव पडतो. वाढीव तापमानामुळे बरेचसे सागरी जीव स्थलांतर करतात. गेली पाच-सहा वर्षे काही मासे त्यांचे ठरावीक क्षेत्र सोडून भलत्याच ठिकाणी गेलेले दिसतात. हवामान बदलाच्या संकटामुळे सागरी परिसंस्थेला मोठया संकटाशी सामना करावा लागत आहे. या परिसंस्थेचे आरोग्य नीट असेल तरच त्याच्या किनाऱ्याने राहणाऱ्या मानवाचे आणि इतर प्राणीमात्रांचे आरोग्य टिकून राहते.
प्रगत देश सागरी पर्यावरणाबाबत ठोस उपाययोजना हाती घेत आहेत. यात समुद्रस्नानापासून मासेमारीपर्यंत प्रत्येक बाबीचा विचार केला गेला आहे. अतिजैविकीकरण व सागरी जलाचे आम्लीकरण रोखणे, सांडपाणी निचरा नियोजन, सागरी प्रदूषणाला बंदी इत्यादी योजना कार्यान्वित झाल्या आहेत.
आपल्या देशाला तीन बाजूंनी सागराने वेढले आहे. त्यामुळे आपण अधिक सजग राहून चौदावे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org