पाणी ही आपल्याला मिळालेली निसर्गाची मोठी देणगी आहे. रोजच्या अनेक कामांसाठी आपण पाण्याचा वापर करतो. पाणी एक उत्तम द्रावक आहे. त्यात अनेक क्षार आणि वायू विरघळतात. आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा आपल्याला जी चव लागते ती त्यात विरघळलेल्या घटकांची असते. आपल्या शरीराला अनेक क्षारांची गरज असते, म्हणून आपण हे क्षारयुक्त पाणी पित असतो. एखाद्या ठिकाणच्या पाण्यात विषारी घटक असतील तर ते काढून टाकावे लागतात. तसेच एखाद्या पाण्याच्या स्रोताला जंतुसंसर्ग झाला असेल तर ते र्निजतुक करावे लागते. अशा प्रकारे र्निजतुक केलेले पाणी आपण पिण्यासाठी आणि रोजच्या इतर कामांसाठी वापरू शकतो. परंतु काही विशिष्ट कामांसाठी पाणी पूर्णपणे शुद्ध असणे आवश्यक असते. जसे वाहनाच्या बॅटरीत टाकावयाचे पाणी, दवाखान्यात, रसायनशास्त्र प्रयोगशाळेत वापरले जाणारे पाणी यामध्ये इतर कोणतेही घटक मिसळले असता कामा नयेत. त्यात फक्त पाण्याचेच रेणू असणे गरजेचे असते. असे अतिशुद्ध पाणी मिळविण्यासाठी त्यावर ऊध्र्वपातन ही प्रक्रिया करतात. ऊध्र्व म्हणजे वर जाणे आणि पतन म्हणजे खाली पडणे. पाण्याला उष्णता दिली की त्याची वाफ होते. ही वाफ हलकी असल्याने वर जाते. ती गोळा करून थंड केली तर वाफेचे सांद्रिभवन होऊन पाण्याचे थेंब खाली पडतात. हेच ते ऊध्र्वपातित जल होय. जेव्हा क्षारमिश्रित पाण्याला ऊर्जा मिळते तेव्हा फक्त पाण्याच्या रेणूचीच वाफ होते. पाण्यात विरघळलेले इतर घटक द्रावणात तसेच राहतात. त्यामुळे वाफ थंड झाल्यावर मिळालेले पाणी पूर्णपणे शुद्ध असते. ऊध्र्वपातनाची प्रक्रिया निसर्गात सतत सुरू असते. सूर्याच्या उष्णतेने जलाशयातील पाण्याची वाफ होते. ही वाफ वर गेली की थंड होते. अनेक बाष्पकण एकत्र येऊन ढग तयार होतात. त्यापासून पाऊस पडतो. पावसाचे पाणी खरे तर पाण्याच्या वाफेचे सांद्रिभवन होऊन तयार झालेले असते. तरीही ते पूर्णपणे शुद्ध आहे, असे म्हणता येत नाही. कारण ढगातून खाली पडत असताना पावसाच्या पाण्याचे थेंब हवेतील वायू आणि धूलिकण यांच्या संपर्कात येतात. हवेतील अनेक वायू त्यात मिसळतात. जैविक इंधनाच्या अमर्याद वापरामुळे आजकाल सल्फर डायॉक्साइड हा वायूदेखील हवेत मोठय़ा प्रमाणात मिसळत आहे. या वायूचा पाण्याशी संपर्क आला तर सल्फ्युरस आम्ल तयार होते. ते मात्र घातक असते.
– डॉ. सुधाकर आगरकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org