ऑक्टोपस, नळ (कटल फिश-सेपिया), माकूळ (स्क्विड-लोलीगो) अशा शीर्षपाद मृदुकाय प्राण्यांबद्दल जनसामान्यांत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून ८ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेफॅलोपॉड जागरूकता दिन’ साजरे केले जातात. यांच्या शीर्षांभोवती अनुक्रमे ८ आणि १० पाय असतात म्हणून त्यांचा विशेष दिन दहाव्या महिन्यातल्या ८ तारखेला साजरा करण्याचे ठरवण्यात आले. ऑक्टोपस म्हणजेच आठ पाय म्हणून ८ ऑक्टोबर त्याचा दिवस. याच्या २८९ प्रजाती असून पायाच्या खालच्या बाजूच्या चूषक कपाच्या साहाय्याने त्याला खडबडीत, गुळगुळीत पृष्ठभागाचे ज्ञान होते. याचे मोठे फुगीर डोके बिळबिळीत असते. त्यामुळे कोणत्याही सांदी-कोपऱ्यातून तो आपले अंग आत-बाहेर काढू शकतो. निळय़ा रक्ताच्या ऑक्टोपसमध्ये ‘हिमोसायनीन’ हे श्वसन-रंगद्रव्य असते. ऑक्टोपसची दृष्टी अत्यंत उत्तम असून गढूळ पाण्यातही चांगले दिसते.
ऑक्टोपस अत्यंत बुद्धिमान अपृष्ठवंशीय प्राणी समजला जातो. शोभेच्या टाकीतून पलायन करणे, बाटल्यांची झाकणे उघडणे, नारळाच्या करवंटीचा हत्यारासारखा उपयोग करणे, अशा करामती ऑक्टोपस करतात. शत्रू समीप आल्यावर जोराने शाईचा फवारा मारणे आणि शत्रू बावचळला असता पळ काढणे हे ऑक्टोपसचे वैशिष्टय़ आहे. रंग बदलता येत असल्याने आजूबाजूच्या परिसरात छद्मावरण संकल्पनेने मिसळून जाणे यांना चांगले जमते. ते अतिवेगाने पोहू शकतात. तसेच छोटय़ा भक्ष्यांची शिकार करतात. सर्वात मोठा ऑक्टोपस ५ मीटर लांब व ५० किलोग्रॅम वजनाचा असून तो प्रशांत महासागरात आढळतो. तर सर्वात छोटी प्रजाती (वुल्फी) जेमतेम २.५ सेंमी लांबीची असते.
सहा महिने ते पाच वर्षे आयुर्मर्यादा असलेल्या ऑक्टोपसची मादी दोन ते चार लाख अंडी एका वेळी घालते आणि त्यांच्यावर पहारा देते. अंडय़ातून पिल्ले बाहेर पडल्यावर मादीच्या शरीरातील पेशी नष्ट होऊ लागतात आणि सरतेशेवटी ती मरण पावते. नर ऑक्टोपसदेखील प्रजनन केल्यावर आयुष्य संपवतो.
ऑक्टोपसच्या शरीररचनेचा अधिक अभ्यास करणे, क्वचित पाळीव सोबती म्हणून पाळणे, त्यांच्याविषयी तयार झालेले वाङ्मय वाचणे अशा विविध पर्यायांतून जागतिक ऑक्टोपस दिन साजरा करतात. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर एकेकाळी अनेक ऑक्टोपस दिसत. मात्र सध्याच्या प्रदूषण आणि मानवी अतिक्रमणामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख /मराठी विज्ञान परिषद