शेतजमिनीची सुपीकता मातीतल्या खनिज द्रव्यांवर अवलंबून असते. शेतात मातीचा एक मीटर जाडीचा थर असेल तर त्यातील खनिजे वापरून आपण सुमारे २५,००० वष्रे शेती करू शकतो, पण ही खनिजे पाण्यात फारच कमी प्रमाणात विरघळत असल्याने ती मुळांवाटे शोषून घेणे हे कार्य वनस्पतींना फार अवघड जाते, म्हणून पाण्यात लीलया विरघळतील अशा स्वरूपाची रासायनिक खते पिकांना देण्याची शिफारस कृषितज्ज्ञ करतात. मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या जेवढी अधिक, तेवढी त्या मातीची सुपीकता अधिक असते. याचे पाठय़पुस्तकांमध्ये दिलेले स्पष्टीकरण असे आहे की मातीतले सूक्ष्मजंतू सेंद्रिय पदार्थाचे, म्हणजे पाने, मृत प्राणी, प्राण्यांची विष्ठा इ. पदार्थाचे विघटन करून त्यांच्यात समाविष्ट असणारे खनिज घटक वनस्पतींना उपलब्ध करून देतात. या पद्धतीने सेंद्रिय शेती करावयाची असेल तर एक हेक्टर शेतीत सुमारे १० हेक्टर क्षेत्रातला त्याज्य शेतमाल खताच्या रूपाने वापरावा लागेल. प्रयोगांती हे सिद्ध झाले आहे की आपण जमिनीत केवळ शुद्ध साखर घातली, तरी जमिनीची सुपीकता वाढते, कारण साखरेचा अन्न म्हणून वापर करून जमिनीतले सूक्ष्मजंतू आपली वाढ करून घेतात. जी खनिजे वनस्पतींना आवश्यक असतात तीच सूक्ष्मजंतूंनाही लागतात, आणि जरी ती कमी विद्राव्यतेमुळे वनस्पतींना उपलब्ध होऊ शकत नसली तरी सूक्ष्मजंतू ती मातीतून आपल्या पेशिकांमध्ये सहज शोषून घेऊ शकतात. सूक्ष्म जंतू स्वत:चे सेंद्रिय अन्न स्वत: तयार करू शकत नाहीत, त्यामुळे जमिनीत घातलेले सेंद्रिय पदार्थ खाऊन संपले की त्यांची उपासमार होऊन ते मरतात आणि त्यांनी शोषून घेतलेली खनिजे वनस्पतींना उपलब्ध होतात. म्हणून आपल्या शेतात साखर, स्टार्च, सेल्युलोज, प्रथिने यांसारखे पदार्थ प्रतिहेक्टर केवळ २५ किलोग्रॅम इतक्या कमी प्रमाणात घालून मातीतल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढविल्यास आपण जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. शेतीच्या या पद्धतीमुळे आपल्या मातीतली खनिजे हळूहळू संपून जातील अशी भीती काही जण व्यक्त करतात, पण असे काही होत नाही, कारण भूगर्भातील खडकांपासून सतत नवी माती निर्माण होतच असते.
लेखक (गाव)
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई२२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा