जमिनीचा पोत म्हणजे जमिनीतील वाळू (जाड व बारीक), गाळ (पोयटा) व चिकणमाती यांचे परस्परांशी असणारे प्रमाण. जमिनीत या चारही प्रकारच्या मातीचे कण कमी-अधिक प्रमाणात असतात. त्यांच्या प्रमाणावरून जमिनीचा पोत ठरवितात. मातीच्या कणांचे प्रमाण किती आहे, हे पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त पिपेटबीकर पद्धतीचा उपयोग करतात.
जमिनीतील पाण्याची चलनवलन क्षमता जमिनीच्या पोतावर अवलंबून असते. मातीचे कण जितके सूक्ष्म तितके अधिक पाणी सूक्ष्म कणांतील पोकळीत साठून राहते. भारी पोताच्या जमिनीत बारीक कणांचे प्रमाण, खनिज द्रव्यांचा साठा आणि जमिनीची जलधारणा शक्तीदेखील अधिक असते. म्हणून पिकांच्या दृष्टीने भारी जमिनी सुपीक असतात. केशाकर्षणामुळे या जमिनीतील पाणी बऱ्याच काळापर्यंत पिकाच्या मुळांना मिळू शकते. हलक्या पोताच्या अथवा वाळूसर जमिनीत पाणी फार वेळ राहत नाही. त्यामुळे पिकास दिलेले खत निचऱ्यावाटे बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते.
जमिनीची प्रतवारी त्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झाल्या आहेत, त्या विभागातील हवामान यांवर अवलंबून असते. उथळ जमिनी, मध्यम खोल जमिनी आणि खोल जमिनी अशी जमिनीची प्रतवारी करतात.
उथळ जमिनी उंच शिखरे व डोंगराळ रांगांवर आढळतात. पिकासाठी या आíथकदृष्टय़ा परवडत नाहीत. या जमिनीमध्ये काही ठिकाणी गंधक, लोह, जस्त आणि बोरॉन या अन्नघटकांची कमतरता आढळते. या जमिनीत वने व कुरणे यांची लागवड फायदेशीर ठरते.
मध्यम खोल जमिनी मेजाकृती पठारावर आढळतात. या मध्यम पोताच्या असून यात नत्र, स्फुरद, लोह, जस्त आणि गंधकाची कमतरता असते. पावसाची अनुकूलता असेल, तर या जमिनीत दुबार पिके घेता येतात.
खोल जमिनी सुपीक असून प्रामुख्याने मदानी विभागात आढळतात. स्मेकटाइट प्रकारची माती विपुल असल्यामुळे या जमिनीची जलधारणाशक्ती जास्त असते. या जमिनीत सेंद्रीय कर्बाचे आणि नत्राचे प्रमाण अतिशय कमी असते. उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण कमी ते मध्यम असून उपलब्ध पालाश जास्त असते. लोह आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा