आज माणूस नवनवीन प्रकारच्या ‘स्वच्छ’ ऊर्जास्रोतांच्या शोधात आहे. त्यात ‘हायड्रोजन’चा इंधन म्हणून उपयोग होण्याची खूप मोठी आशा आहे. अशा परिस्थितीत हायड्रोजन स्पंज संमिश्र खूप महत्त्वाचं ठरणार आहे. हायड्रोजन स्पंज संमिश्रामध्ये त्याच्या स्वत:च्या आकारमानाच्या ४०० पट जास्त आकारमानाइतका हायड्रोजन वायू साठवून ठेवता येतो. या संमिश्रामध्ये जेव्हा जेव्हा हायड्रोजन वायू शोषला जातो तेव्हा तेव्हा ऊर्जा बाहेर दिली जाते. म्हणून या स्पंज संमिश्राला ऊर्जेच्या संदर्भात खूप महत्त्व आहे. या स्पंज संमिश्रामध्ये ‘लॅन्थॅनम’चा महत्त्वाचा सहभाग असतो. तसा पेट्रोलियम उद्योगातही ‘लॅन्थॅनम ऑक्साइड’ आणि त्याचबरोबर इतर काही लॅन्थॅनाइड ऑक्साइड्स यांची उत्प्रेरक म्हणून खूप मोठी मदत असते. फिल्म इंडस्ट्रीमध्येदेखील स्टुडिओमधली प्रकाश देणारी उपकरणं आणि प्रोजेक्टर, किंवा अनेक ठिकाणी वापरले जाणारे कार्बन आर्क दिवे यांच्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचा दर्जा वाढवण्यासाठीही ‘लॅन्थॅनम’ मदतनीस म्हणून उपयोगात आणला जातो. तसेच काचेच्या वस्तू तयार करण्यामध्ये ‘लॅन्थॅनम’ महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे ‘लॅन्थॅनम’च्या अस्तित्वामुळे, स्टीलचे, वर्धनीयता आणि तन्यता हे दोन्ही गुणधर्म आणखी सुधारतात.

अनेक तलावांमध्ये शैवाल वाढीस लागतं. कित्येक तलावांच्या पाण्यात असलेल्या फॉस्फेट्सवरती हे शैवाल पोसले जात असते.  बेन्टोनाइट हे ‘लॅन्थॅनम’ असलेले एक संयुग आहे. ते ‘फॉसलॉक’ म्हणून ओळखले जाते; कारण ते पाण्यातल्या फॉस्फेट्सना निकामी करते- जेणेकरून त्यावर शैवालाची वाढ खुंटते आणि तलावांचे पाणी स्वच्छ राहायला मदत होते.

तशी मानवी शरीरात ‘लॅन्थॅनम’ची  काही जीवशास्त्रीय भूमिका नाही. पण ‘फॉस्फेट्स’ना बांधून ठेवण्याच्या त्याच्या गुणधर्मामुळे, मूत्रिपडाच्या काही आजारांत (जेव्हा ‘फॉस्फेट्स’ प्रमाणाबाहेर वाढतात), ‘लॅन्थॅनम काबरेनेट’ हे संयुग असलेले औषध दिले जाते. पण ते अत्यंत अल्प प्रमाणात शरीरात शोषले जाते आणि परत शरीराबाहेर पडायलाही त्याला खूप वेळ लागतो.

‘लॅन्थॅनम’चे काही आयसोटोप्स किरणोत्सारी असतात आणि त्यांचा किरणोत्सार हजारो वर्षे चालू राहतो. पण ‘लॅन्थॅनम’चा निसर्गातला आढळ कमी असल्याने या किरणोत्साराचे फारसे पडसाद उमटत नाहीत.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org