पृथ्वीवरील सजीव सृष्टीत सर्वात प्रगत आणि प्रखर बुद्धिमत्ता मानवाकडे आहे. तिच्या जवळपास पोहोचेल अशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याचे स्वप्न आपण प्रदीर्घ काळ जोपासले आहे. म्हणजे आपण करू शकत असलेल्या जमेल तितक्या भौतिक, मानसिक आणि वैचारिक गोष्टी सक्षमपणे करू शकेल असे यंत्र तयार करणे हा आपला प्रयत्न राहिलेला आहे. असा विचार करणे हेदेखील आपल्या बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे. तरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया कसा रचला गेला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. त्याचे पाच मूलभूत घटक असे आहेत : (१) शिकणे, (२) कारणमीमांसा करणे, (३) समस्या सोडवणे, (४) बोध घेणे, आणि (५) भाषा समजणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पाच पायाभूत घटकांना कार्यान्वित करू शकणारे तंत्रज्ञान आणि आज्ञावली निर्माण करून संगणक क्षेत्रातील तज्ज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसन आणि तिचे उपयोजन साध्य केले आहे. यामुळे एक विशिष्ट किंवा काही निवडक कामे यांत्रिक शक्ती व क्लुप्तीने अचूकपणे पार पाडणारी बहुविध उत्पादने आणि सेवा बाजारात उपलब्ध होत आहेत. या प्रत्येक घटकाची आपण ओळख करून घेऊ.

पहिला घटक आहे तो अध्ययन म्हणजे शिकण्याचा. आपण कुठलीही नवी गोष्ट करताना चुका करतो आणि नंतर त्या सुधारून व सराव करून तिच्यावर प्रभुत्व मिळवतो. त्याच धर्तीवर एखाद्या गोष्टीची किंवा कृतीबाबतची सर्वागीण माहिती, तसेच ती हाताळणे आणि तिच्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती (अ‍ॅल्गोरिदम्स) संगणकसदृश यंत्राला प्रोग्राममार्फत सादर केल्या जातात. काही नव्या माहितीवर त्यांचा सराव करून घेतला जातो. दोष आढळल्यास तसा प्रतिसाद देऊन बदल केले जातात, तसेच ते बदल कसे करावे याच्या वेगळय़ा पद्धती यंत्राला पुरवल्या जातात. त्या सर्व गोष्टी यंत्र आपल्या स्मृतीमंजूषेत संग्रहित करून ठेवते. अशा रीतीने यंत्र अनुभवी होत जाते. म्हणजेच यंत्र सुरुवातीस आपल्याकडून आणि काही काळाने स्वत: सुधारणा करून ‘शिक्षित’ होत जाते. थोडक्यात, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रोग्राम्सचा वापर करून कुठल्या कृती बरोबर ठरल्या आणि कुठल्या चूक याचा दर वेळी आढावा घेऊन नवीन परिस्थिती किंवा समस्या हाताळताना यंत्र अधिक बिनचूक निर्णय घेते. असे हजारो अनुभव घेऊन त्या विशिष्ट कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त यंत्र आपल्या इतके कार्यक्षम होत जाते.

पुढील घटकांचा ऊहापोह पुढच्या लेखांत घेऊ.

डॉ. विवेक पाटकर,मराठी विज्ञान परिषद

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laoksatta kutuhal fundamentals of artificial intelligence amy
Show comments