लॉरेन्सिअम या मूलद्रव्याला अन्रेस्ट लॉरेन्स या शास्त्रज्ञाचे नाव देण्यात आले. याचे विशेष कारण म्हणजे लॉरेन्स यांनी शोधलेल्या सायक्लोट्रोन या उपकरणाचा उपयोग अनेक कृत्रिम मूलद्रव्ये शोधण्यासाठी करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीतयुद्धाच्या काळात रशिया व अमेरिका यांनी अनेक नवनवीन किरणोत्सारी मूलद्रव्ये बनवून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. तसेच या मूलद्रव्यांच्या शोधाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. १९५८ मध्ये लॉरेन्स बर्कले लॅबोरेटरी (एल.बी.एल.) येथे अल्बर्ट घिओर्सो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या वेळी नोबेलिअमच्या शोधाचा दावा केला त्याच वेळी त्यांना क्युरिअम-२४४ वर नायट्रोजन-१४ कणांचा मारा करून अणुक्रमांक १०३ चे समस्थानिक-२५७ असलेले मूलद्रव्य मिळाल्याचा कयास बांधला होता. परंतु पुरेशा पुराव्याअभावी त्यांना ते सिद्ध करता आले नाही. तरीही त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने हे मूलद्रव्य मिळविण्याचा प्रयत्न केला. पुढे १९६०मध्ये त्यांनी कॅलिफोíनअम-२५२ वर बोरॉन-११ कणांचा मारा करून लॉरेन्सिअम-२५९ समस्थानिक मिळविता येते का ते पाहिले. यावेळीसुद्धा त्यांना निर्णायक असे काही हाती लागले नाही. परंतु पुन्हा एकदा १९६१मध्ये क्युरिअम-२४९ ते २५२ अशा मिश्र समस्थानिकांवर बोरॉन-१० व ११ यांच्या मिश्र कणांचा मारा करून लॉरेन्सिअम-२५७ हे समस्थानिक मिळाल्याचा दावा केला. या नवीन मूलद्रव्याचे लॉरेन्सिअम हे नावही सुचविले.

दरम्यानच्या काळात रशियातील ‘रशियनजॉइन्ट इन्स्टिटय़ूट फॉर न्यूक्लिअर रिसर्च (जे.आय.एन.आर)’ मधील जॉर्जी फ्लेरॉव व इतर शास्त्रज्ञांनी १९६५मध्ये अमेरिशिअम-२४३ वर ऑक्सिजन-१८ कणांचा मारा करून लॉरेन्सिअम-२५६ ची यशस्वी निर्मिती केली. परंतु या नवीन मूलद्रव्याचे नाव रुदरफोर्डिअम असे सुचविले. तसेच त्यांनी एल.बी.एल. प्रयोगशाळेतील प्रयोगांची पुनर्तपासणी केली व त्यात त्रुटी असल्याचे सांगितले. पण एल.बी.एल.च्या वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा त्यांच्या प्रयोगात मिळालेले मूलद्रव्य लॉरेन्सिअम-२५८ असल्याची मांडणी केली.

अशा प्रकारे लॉरेन्सिअमवरील संशोधन अर्धवट अवस्थेत असतानाच १९७१ साली आयुपॅकने लॉरेन्सिअमच्या शोधाचे श्रेय एल.बी.एल. प्रयोगशाळेला दिले. पुढे हे प्रकरण ‘ट्रान्सफर्मिअम वìकग ग्रुप (टीडब्ल्यूजी)’ समोर गेले. हा गट आयुपॅकने अणुक्रमांक १०० पुढील मूलद्रव्यांवर होणारे विवाद सोडविण्यासाठी १९९२ साली स्थापन केला होता. टी.डब्ल्यू.जी. ने शेवटी असा निकाल दिला की लॉरेन्सिअमच्या शोधाचे श्रेय ‘एल.बी.एल.’ आणि ‘जे.आय.एन.आर.’ या दोन्ही प्रयोगशाळांना देण्यात यावे आणि मूलद्रव्याचे नाव लॉरेन्सिअम असेच ठेवण्यात यावे.

– डॉ. शिवराम गर्जे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawrencium chemical element