पिसाच्या कललेला मनोऱ्याला एक वैज्ञानिक चमत्कार म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळाली आहेच; परंतु पिसा शहरवासीयांना याचे काही अप्रूप नाही. याचे कारण म्हणजे या मनोऱ्याशेजारचे सांता मारिया कॅथ्रेडल आणि बाप्टीस्ट्री यांच्या वास्तूसुद्धा अर्धा ते एक अंशातून कलल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील काही खासगी प्रासाद, सेंट मायकेल चर्च आणि सेंट निकोलाय चर्च यांचे बेल टॉवरसुद्धा एक ते दीड अंशातून झुकलेत! हा सर्व चमत्कार झालाय तो तिथल्या मूळच्या दलदलीच्या जमिनीमुळे. पिसाच्या कलत्या मनोऱ्याचे बांधकाम ११७३ साली सुरू झाले. पाच वर्षांत ११७८ मध्ये मनोऱ्याचे तीन मजले बांधून झाल्यावर तो कलतोय हे लक्षात आल्यावर काम थांबले. मनोऱ्याचा वास्तुरचनाकार बोनॅनो पिझानो होता आणि त्याचा मूळ आराखडा आठ मजल्यांचा आणि ५६ मीटर उंचीचा होता. तांत्रिक अडचणी, राजकीय अस्थर्यामुळे मनोऱ्याचे थांबलेले काम १२७२ साली परत सुरू झाले आणि १२७८ मध्ये सात मजले पूर्ण झाले. या काळात चौथ्या मजल्यापासून वरचे मजले झुकावाच्या बाजूने अधिक उंचीचे बांधले गेले, पण झुकाव वाढतच राहिला. अखेरीस १३७० साली या मनोऱ्याचा आठवा मजला बांधून पूर्ण झाला. अशा रीतीने या कामाला दोन शतकांचा कालावधी लागला. १९३४ मध्ये इटालीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलीनीने मनोऱ्याच्या पायात ३६१ मोठी छिद्रे पाडून त्यात सिमेंट ग्राऊटिंग इंजेक्ट करण्याचा प्रयोग करून बघितला. तरीही त्याचे कलणे वाढलेच आहे. आजपर्यंत मनोऱ्याचा झुकाव थांबण्यासाठी अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग होऊनही मनोऱ्याचे कलणे वाढतेच आहे. मध्यंतरी मनोऱ्याच्या झुकावाच्या विरुद्ध बाजूला पायात ६०० टन शिसे भरण्याचा प्रयोग मात्र थोडाफार यशस्वी झालाय. त्याआधी त्याचा झुकाव ओळंब्याच्या बाहेर साडेचार मीटर होता तो सध्या ३.८ मीटरवर स्थिर झालाय. तळमजल्यापेक्षा आठवा मजला ३.९९ अंशांनी झुकलाय. अत्यंत मोहक अशा पांढऱ्या संगमरवराच्या शुभ्र खांबांनी आणि जाळीदार झरोक्यांनी प्रत्येक मजला सुशोभित झालेला हा मनोरा त्याच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातल्या दोषामुळेच अधिक प्रसिद्धी पावला हे विशेष!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा