डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
शाळेला सुट्टी असली की मुलांना खूप आनंद होतो. का बरं? शाळा कशी असावी, याबद्दल अमेरिकी मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत मार्शल रोझेनबर्ग यांनी म्हटलं आहे की, शाळा आयुष्य समृद्ध करणारी असावी. त्यांच्या शब्दांत सांगायचं तर, शाळा ही ‘लाइफ एन्रिचिंग’ असावी. त्यांनी शाळेला व्यापक अर्थ देऊ केला आहे.
मुलांचं आयुष्य समृद्ध करणाऱ्या अशा शाळांचं ध्येय काय असेल, याबद्दल सुचवताना ते म्हणतात, अशा शाळेत येऊन :
– मुलांचं आयुष्य सुंदर झालं पाहिजे.
– प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या गरजेनुसार ज्ञान, माहिती मिळाली पाहिजे.
– त्याला स्वत:शी आणि इतरांशी जोडून घेता यायला हवं. इतरांशी आदानप्रदान करण्यात एक आनंद असतो. तो नैसर्गिक असतो. त्यातूनच आपण बरंच काही शिकत असतो. त्यामुळेच इतरांशी मोकळेपणानं मत्री होईल, असं वातावरण तयार व्हायला हवं.
शाळेचं हे एक आदर्श चित्र आहे. मात्र पारंपरिक शाळा अशा नसतात. रोझेनबर्ग यांच्या मते कशी असते पारंपरिक शाळा? तर :
– कोण बरोबर वा चूक, हे ती सिद्ध करत असते.
– ज्येष्ठांचं कसं ऐकायचं असतं, याचे पाठ देते.
– शिक्षा, बक्षिसं, अपराधी भावना, शरम, कर्तव्य (नेमून दिलेलं काम करणं), दुसऱ्याचे उपकार मानणं अशा गोष्टींच्या आधाराने मुलांच्या वर्तनाला वळण लावण्याचं काम करते.
यातल्या काही मुद्दय़ांचा नीट विचार केला, तर आपण आपल्या शाळेत हा नवा दृष्टिकोन आणू शकू. तसंच आपल्या घरातल्या लहान मुलांच्या बाबतीतही आयुष्य-समृद्धीचा विचार करू शकू.
‘आयुष्य समृद्ध करणं’ म्हणजे काय? तर :
– एखाद्या कलेनं आपलं आयुष्य समृद्ध होतं.
– भरपूर फिरता यायला यावं. सगळं जग नाही, पण आपल्या आवाक्यातला परिसर पाहिला तरी आयुष्य समृद्ध होतं माणसाचं.
– पसा आणि आरोग्य असलं की आपण समृद्ध असतो, असं म्हणायला हरकत नाही.
– नवीन काही तरी शिकण्याची इच्छा जागती असणं म्हणजे आयुष्य समृद्ध असणं.
– आपण आयुष्यात कोणासाठी तरी काही करणं म्हणजे आपलं आयुष्य समृद्ध करणं.
शाळा किंवा पालक म्हणून यातलं काय करतो आपण?