अतुल कहाते
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये ‘ह्युमनॉइड’ नावाची संकल्पना असते. माणसासारखे बाह्य रूप आणि गुणधर्म दर्शवणारा यंत्रमानव म्हणजे ‘ह्युमनॉइड’. पूर्वीपासूनच अशा यंत्रमानवाच्या क्षमतांवर किती मर्यादा येऊ शकतात हा प्रश्न चर्चिला जाई. समोर दिसत असलेली आकृती म्हणजे माणूस आहे का यंत्रमानव; हे आपल्याला ओळखता येऊ नये इतकी मानवी क्षमता यंत्रमानवामध्ये तयार करणे हे अनेक जणांचे खूप पूर्वीपासूनचे स्वप्न आहे. दृश्य स्वरूपात आणि यांत्रिकी प्रकारच्या कामांमध्ये यंत्रमानव माणसाच्या अगदी जवळपास आला, तरी विचार आणि भावना यांचे काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानवी मन नेमके कसे असते आणि त्याच्यामध्ये नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी तत्त्वज्ञांपासून वैज्ञानिकांपर्यंत अनेक जगविख्यात लोकांनी अफाट प्रयत्न केले आहेत. यातून झालेल्या उलगड्याच्या अनुषंगाने मानवी मनाचे प्रारूप तयार करण्याचे प्रकल्प काही जणांनी हाती घेऊन त्यानुसार यंत्रमानवाला माणसाच्या अगदी जवळ नेण्याचे प्रयत्न केले आहेत. मानवी वर्तनामधल्या तर्कबुद्धीला आधार मानून केलेल्या गोष्टी, भावनांच्या भरामध्ये केलेल्या गोष्टी, सहजपणे आणि कधीकधी अतर्क्यपणे केलेल्या गोष्टी हे सगळे ठरावीक नियमांमध्ये बसवणे वरकरणी तरी अशक्य वाटते. अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने आजवर आपल्याला अशक्य वाटत असलेल्या गोष्टी सहजसाध्य केलेल्या असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला एखादी गोष्ट असाध्य आहे असे म्हणणेच आता धाडसाचे वाटते.

हेही वाचा : कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोजगार

आकलन, वर्तवणूकविषयक, भौमितीय, भौतिक अशी मानवी विचारांची आणि मनाची अनेक दालने असतात; असे अभ्यासक म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध, त्यांच्या जवळपास अगणित जुळण्या हे सर्व ठरावीक समीकरणांमध्ये बांधणे हे किती किचकट काम असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. इतकेच नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या हे शक्य झाले तरी यंत्रमानवाच्या ‘मनात’ निर्माण झालेल्या या कृत्रिम भावना मानवी भावनांशी मिळत्याजुळत्याच असतील असे आपण म्हणू शकू का? पुन्हा त्यात पूर्वग्रह, पार्श्वभूमी, नैतिकता, विचारसरणी, परिस्थिती या सगळ्या गोष्टींची सरमिसळ कशी करायची? साहजिकच या भावनाही मानवी भावनांसारख्या असतील, असे आपण म्हणू शकणार नाही. म्हणजेच यात असंख्य वादविवाद निर्माण होतील.

हेही वाचा : कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे

फार तर ठरावीक प्रकारच्या परिस्थितीमध्ये आणि मर्यादित गोष्टींसाठी या भावना उपयुक्त ठरू शकतील. उदाहरणार्थ मानसिक आधाराची गरज असलेले वृद्ध लोक, जोडीदार नसल्यामुळे एकाकी असलेले लोक अशांसाठी हे यंत्रमानव वरदान ठरू शकतील.

अतुल कहाते

मराठी विज्ञान परिषद

ईमेल – office@mavipa.org

संकेतस्थळ – http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta article on artificial intelligence emotions css