अतुल कहाते
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा रोजगारांवर परिणाम होईल का; हा प्रश्न खरे म्हणजे केव्हाच निकाली निघाला आहे. याचे उत्तर होकारार्थी आहे, याविषयी कुणाच्याच मनात शंका नसावी. काही प्रमाणात याचे पडसाद अलीकडच्या काळात उमटताना दिसतात. अधूनमधून काही कंपन्यांनी आपल्या काही कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देऊन त्यांचे काम कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाकडून करून घेण्यासंबंधीच्या घोषणा केल्याच्या बातम्या येत असतात. एप्रिल २०२४ मध्ये स्वित्झर्लंडमधल्या रोजगारांविषयीच्या एका नामांकित कंपनीने नावाजलेल्या २०० कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या प्रश्नासंबंधी चर्चा केली असता त्यामधल्या तब्बल ४१ टक्के जणांनी पुढच्या पाच वर्षांतच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगारकपात झाल्याचे दिसून येणार असल्याचे विधान केले.

याचे लोकांवर दूरगामी परिणाम असतील, हे वेगळे सांगायला नको. येत्या काळात सगळ्याच लोकांना प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे जवळपास बंधनकारक होईल. नवी कौशल्ये आत्मसात करणे, दीर्घकाळ नोकऱ्यांऐवजी कंत्राटी प्रकारची कामे स्वीकारणे, सतत होत असलेल्या बदलांनुसार आपल्या कामामध्ये बदल करणे, आपल्या कार्यक्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित कौशल्ये आत्मसात करणे अपरिहार्य असेल. स्वाभाविक शिक्षणाशी संबंधित धोरणांमध्ये मूलभूत बदल करावे लागतील. तसेच रोजगारनिर्मिती, बेकारी अशा गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून बघावे लागेल. पारंपरिक अभ्यासक्रम, पदव्या, शिक्षणाच्या पद्धती यांना अत्यंत लवचीक आणि आधुनिक करावे लागेल.

हेही वाचा : कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे आणि तोटे

अर्थात याची दुसरी बाजू म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे नव्या प्रकारचे रोजगारही उपलब्ध होतील. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यावर या तंत्रज्ञानाला पूरक ठरतील अशी कौशल्ये लोकांना आत्मसात करावी लागतील. म्हणजेच आपण करत असलेले काम कृत्रिम बुद्धिमत्तेकडून करून घ्यायचे आणि आपण त्यात आणखी भर घालायची; असे अनेकांच्या कामाचे स्वरूप असेल. साहजिकच यामुळे त्यांची उत्पादकता निश्चितच वाढेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांना याची जाण येणे, त्याचे भान येणे आणि त्यासाठीची कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित होणे हे सगळे राष्ट्रीय पातळीवर घडू शकेल का? याची शक्यता बरीच कमी असल्यामुळे ज्यांच्या हातांमध्ये संसाधने आहेत आणि जे घडत असलेले बदल ओळखण्याची क्षमता बाळगतात त्यांनाच याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा : कुतूहल: फायदे आणि तोटेही ‘विदा’वर अवलंबून !

एका अर्थाने सध्याच्या ‘आहे रे’ आणि ‘इतर’ या वर्गांप्रमाणे भविष्यात ‘कृत्रिम बुद्धिमत्तावाले’ आणि ‘इतर’ असे आणखी दोन गट निर्माण होऊ शकतात. काळाची पावले ओळखून त्यानुसार भविष्याचा मार्ग आखण्याची संधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी एवढी सदिच्छा आपण व्यक्त करू शकतो!

अतुल कहाते

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.com