आभा बर्वे-दीक्षित
काम करताना मानवाच्या सुरक्षिततेचा जिथे प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली उत्तम काम करू शकते. बॉम्ब निकामी करणे, खोलवर खाणीमध्ये काम करणे, समुद्राच्या तळाशी तेलविहिरीमध्ये, अणुभट्टीत देखभालीचे काम करणे, अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये देशाच्या सीमारेषांची सुरक्षितता जपणे अशा पद्धतीच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या यंत्रांचा उपयोग होऊ शकतो, त्यामुळे माणसांची सुरक्षितता साधली जाऊ शकते.

आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध ग्राहकाभिमुख सेवा देणाऱ्या व्यवसायांमध्ये केला जातो, विविध सेवांमध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडीचे कंटेन्ट, चित्रपट अथवा लेख सुचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य विश्लेषण, शिफारस प्रणाली या तंत्राचा वापर केला जातो. या तंत्रांची सांगड नैसर्गिक भाषा आकलन, व्हॉइस रेकॉर्ड, संगणक दृष्टी या तंत्रांबरोबर घालून शारीरिक क्षमता नसलेल्या ग्राहकांनासुद्धा या सर्वांचा लाभ घेता येतो.

हेही वाचा :कुतूहल: फायदे आणि तोटेही ‘विदा’वर अवलंबून !

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा एक मोठा तोटा म्हणजे यासाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील विदा आणि आधुनिक संगणकीय साधने, त्यासाठी करावी लागणारी मोठी आर्थिक गुंतवणूक. तयार झालेल्या प्रणालीच्या देखभालीसाठीही काही खर्च येऊ शकतो. काही कालावधीनंतर ही प्रणाली अद्यायावत करण्यासाठीही आर्थिक गुंतवणूक करावी लागते.

संगणकीय प्रणालींमुळे माणसाला काही स्वरूपाच्या मदतीसाठी मानवी मदतीची गरज उरत नाही. वेबसाइटवर ग्राहकांशी संवाद साधायला चॅटबॉट वापरले जातात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे नकाशे, रस्त्यांची, वाहतुकीची माहिती हे सर्व आपल्याला मोबाइलमध्ये उपलब्ध असते. या सर्वांमुळे मानवी आयुष्य अधिक सुकर झाले आहे.

हेही वाचा :कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन

या सर्व सुविधांमुळे मानवाचे स्वत:च्या बुद्धिमत्तेवरचे अवलंबित्व कमी होते. त्यामुळे मानवी बुद्धीच्या निष्क्रियतेला चालना मिळेल अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. सध्याच्या निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (जनरेटिव्ह एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाने नावीन्यपूर्ण माहिती, मजकूर, चित्रे, चलचित्रे तयार होत असली तरी त्यांची नावीन्यपूर्णता ही त्या तंत्रज्ञानाला उपलब्ध करून दिलेल्या व ज्या विदावरून प्रणाली तयार झाली आहे त्या विदाने सीमित केलेली असते. साहजिकच त्यांना मानवी क्षमतांच्या तुलनेत मर्यादा आहेत. मानवी भावनिक बुद्धिमत्ता अजून तरी कोणत्याही यंत्रांमध्ये निर्माण होऊ शकलेली नाही. म्हणूनच अपवादात्मक परिस्थितीमध्ये माणूस जसे विवेकी निर्णय घेतो तसे निर्णय या प्रणालींना घेता येऊ शकणार नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान साकल्याने मानवाला वापरावे लागेल.

आभा बर्वे-दीक्षित

मराठी विज्ञान परिषद

ईमेल – office@mavipa.org

संकेतस्थळ – http://www.mavipa.com

m