भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे. वराहमिहिरांनी बृहत्संहितेत पाण्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. त्यात ढगांचे, पर्जन्यवृष्टीचे, भूपृष्ठावर साठणारे आणि जमिनीत जिरणारे पाणी यांचे संदर्भ विस्ताराने येतात. जमिनीवरील पाणी जमिनीखाली झिरपून खडकांमधील भेगांमधून प्रवाहित होते, आणि सच्छिद्र खडकांमधे ते साठून राहाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडच्या काळात हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे परवलीचे शब्द झाले आहेत. पृथ्वीचे तापमान नैसर्गिक कारणांमुळेदेखील वाढत असले, तरी सध्याची तापमानवाढ आणि हवामान बदल हे मुख्यत: मानवननिर्मित आहेत. मानवी क्रियाकलापांमुळे कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण हवेत वाढले की हरितगृह परिणाम अस्तित्वात येऊन त्याच्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढण्याचा संभव असतो. याचाच परिणाम होऊन हवामान बदल घडून येतो. २०२४ चा भयानक उन्हाळा, किंवा २०२३ मध्ये एकीकडे अवर्षण तर दुसरीकडे पुण्यासारख्या ठिकाणी कमी वेळात भरपूर पाऊस पडल्याने उद्भवलेली परिस्थिती, ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. पावसाच्या आगमनाच्या आणि पडण्याच्या स्थितीत झालेला बदलदेखील काही वर्षांपासून अनुभवास येतो आहे. या सर्व बदलांचा थेट परिणाम पाण्याचे साठे आणि भूजलावर होत असतो.

हेही वाचा : कुतूहल : ‘भूवैज्ञानिक सर्वेक्षण’चे पहिले अधीक्षक टॉमस ओल्डहॅम

जेव्हा भूपृष्ठावरील उपलब्ध पाणीसाठा कमी पडतो, आणि त्याच्या वापराचे नियोजन बिघडते, तेव्हा भूजलावर अवलंबून राहावे लागते. गेल्या काही वर्षात भूजलाचा वापर बेसुमार वाढला आहे. ते विहिरींच्या अथवा कूपनलिकांच्या द्वारे वापरले जाते. जोपर्यंत भूजलाचे पुनर्भरण होत राहाते, तोपर्यंत भूजलसाठा वापरात आणायला काही प्रत्यवाय नसतो. पण जेव्हा पावसाचे प्रमाण, पाऊस पडण्याची पद्धत, मातीचा प्रकार, तिच्यावरील आच्छादन, जमिनीचा उतार हे आणि यांसारखे इतर घटक प्रभावित होतात; तेव्हा भूजलाच्या पुनर्भरणावर मर्यादा येतात. नुसताच उपसा सुरू राहिल्याने भूजलाची पातळी आणि गुणवत्ता दोन्ही खालावत जातात.

हेही वाचा : कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा

खडकांचे गुणधर्म. पाणी साठवणक्षमता, मातीचा प्रकार, तापमान, वाऱ्याचा वेग, जमिनीचा उतार, जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन. पावसाचे प्रमाण आणि स्वरूप, अशा अनेक गोष्टींचा भूजलसाठ्यावर परिणाम होत असतो. पावसाचे पाणी हे रंगरहित आणि चवरहित असते. पण जमिनीत झिरपल्यानंतर खडक व मातीच्या प्रकारानुसार पाण्याची क्षारता व चव बदलत जाते.

सध्याच्या काळातील पाणीटंचाई आणि लहरी हवामानामुळे वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी भूजलाचे पुनर्भरण आणि काटकसरीने वापर हे कळीचे मुद्दे बनले आहेत.

डॉ. योगिता पाटील

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta article on groundwater and climate change css