डॉ. संजीव बा. नलावडे
सहारा हे जगातले सर्वात मोठे वाळवंट आहे. त्याचा विस्तार ९० लाख चौरस किलोमीटर, म्हणजे भारताच्या जवळपास तिप्पट आहे. हे विशाल वाळवंट आफ्रिका खंडाच्या उत्तर भागातील ११ लहान-मोठ्या देशांमध्ये, पश्चिमेला अटलांटिक महासागरापासून पूर्वेला तांबड्या समुद्रापर्यंत पसरलेले आहे. अनेक उंच पर्वतरांगा, खडकाळ पठारे, चाळ-खडेयुक्त (ग्रॅव्हेली) मैदाने आणि वाळूच्या टेकड्यांनी ते बनले आहे.

सहाराचा बराच भाग पठारी असून तो समुद्रसपाटीपासून ४६० मीटर उंच आहे. काही पर्वत शिखरे ३,००० मीटर किंवा त्याहूनही उंच आहेत. इजिप्तमध्ये असणारा क्वात्तारा हा खोलगट भाग समुद्रसपाटीच्या १३३ मीटर खाली आहे. वाळूच्या टेकड्यांनी या वाळवंटाचा जेमतेम १० टक्के भाग व्यापला आहे. या टेकड्या वाऱ्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेल्या जातात.

हेही वाचा : कुतूहल : भूजल आणि हवामानबदल

इथले हवामान कोरडे आणि उष्ण असून वार्षिक पर्जन्यमान अवघे २० सेंटिमीटर आहे. दिवसा असह्य तापमान आणि रात्री कडक थंडी अशी विषम स्थिती इथे असते. विविध प्रकारचे गवत, झुडपे आणि झाडे इथे वाढतात. त्यांनी इथल्या शुष्क परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. अनेक वनस्पतींच्या बिया जमिनीत सुप्तावस्थेत असतात. पहिल्या पावसाचे शिंपण होताच त्यांना कोंब फुटतात. बहुतेक वनस्पती अल्पजीवी असून कोंब येणे, फांद्या आणि पाने फुटणे, फुले फुलणे, फळे येऊन बियांची निर्मिती होणे हे संपूर्ण जीवनचक्र दीड ते दोन महिन्यांत पूर्ण होते. जास्त आयुर्मान असणाऱ्या वनस्पतींची मुळे ओलाव्यासाठी जमिनीत खोलवर जातात. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही कुरंग हरीण, फेनेक (एक प्रकारचे खोकड), जेर्बील (बिळे करून राहणारा उंदरासारखा प्राणी), साप, सरडे असे काही वन्यजीव येथे आढळतात. ते पाण्याशिवाय दीर्घकाळ जगू शकतात. त्यांना वनस्पतींद्वारे मिळणारे पाणी पुरते.

इजिप्तमधल्या नाईल खोऱ्याचा सुपीक भाग सोडल्यास इथे मानवी वस्ती अत्यंत विरळ आहे. मरु-उद्याने (ओअॅसिस) तुरळक असून पाण्याच्या शोधार्थ उंटासह भटकंती करणारे मानवी समूह जागोजागी आहेत. खनिज तेल, नैसर्गिक वायू, लोहखनिज आणि फॉस्फेट ही खनिजे काही भागात आढळतात.

हेही वाचा : कुतूहल : ‘भूवैज्ञानिक सर्वेक्षण’चे पहिले अधीक्षक टॉमस ओल्डहॅम

दहा हजार वर्षांपूर्वी सहारा प्रदेश अधिक आर्द्र होता, पर्जन्यमानही जास्त होते. जागोजागी तळी, नदीप्रवाह, गवताळ प्रदेश आणि वने होती. पाणघोडे, जिराफ अशा पशूंचा राबता होता. चार ते पाच हजार वर्षांपूर्वी येथील पर्जन्यमान घटू लागले. हवामान शुष्क होत गेले आणि वाळवंटाची निर्मिती झाली.

डॉ. संजीव बा. नलावडे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader