एकविसाव्या शतकात आत्तापर्यंत मुकी, स्थिर, अचल असणारी यंत्रं ‘स्मार्ट’ झाली; यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा वाटा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अलेक्सा, सिरी यांसारख्या यंत्रांना माणसांसारखा विचार करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं असं म्हटलं जातं. असं असलं तरी मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता हा पर्याय ठरू शकत नाही. जी कामं आपण प्रत्यक्ष बँकेत जाऊन करतो ती सगळी कामं आपण आता इंटरनेट बँकिंग वापरूनही करतो. नेमका हाच फरक मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही पूर्णपणे आभासी आहे. ती सॉफ्टवेअरवर चालते. मानवी मेंदू आभासी नाही. तो प्रत्यक्ष अस्तित्वात आहे आणि मानवी मेंदूतल्या घडामोडी खऱ्या असतात.

आपल्या मेंदूची काम करण्याची पद्धत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मानवी मेंदू अनुभवांवर आधारित निर्णय घेतो. एकसारख्याच दोन परिस्थितींमध्ये मानवी मेंदू दोन पूर्णपणे भिन्न निर्णय घेऊ शकतो. याउलट कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्रथम माहिती / विदा गोळा केली जाते. मग त्या माहितीवर निरनिराळे अल्गोरिदम वापरून अनेक गणिती प्रक्रिया केल्या जातात, त्यानंतरच आपल्याला उत्तर (निर्णय) मिळते. कृत्रिम बुद्धिमत्ता एका प्रकारच्या माहितीवर एकाच प्रकारचे उत्तर (निर्णय) आपल्याला देते.

अलीकडे माणसाच्या नैसर्गिक मेंदूसारखी बुद्धिमत्ता असणारं खरंखुरं यंत्र बनवण्याच्या दिशेनं संशोधकांनी प्रयत्न चालू केले आहेत. हा मानवनिर्मित मेंदू अगदी माणसासारखाच विचार करणारा, निर्णय घेणारा असेल. या बुद्धिमत्तेला शास्त्रीय भाषेत ‘संश्लेषित बुद्धिमत्ता (सिंथेटिक इंटेलिजन्स)’ म्हणतात. संश्लेषित बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला सतत प्रोग्रामिंगची गरज पडणार नाही असं यंत्र! एकदा हे यंत्र सुरू झालं की आपल्या आपण किंवा आपोआप ते मानवी मेंदूसारखं कुठल्याही बाह्य मदतीशिवाय काम करत राहील. स्वत:ला लागणारी ऊर्जाही ते स्वत:च मिळवू शकेल, असेही प्रयत्न केले जातील. या संश्लेषित बुद्धिमत्तेला ‘सिंथेटिक इंटेलिजन्स’ हे नाव जॉन हॉगलँड या संशोधकानं १९८६ साली दिलं. माशाप्रमाणे एखादी पाणबुडी समुद्रात आपल्या आपणच पोहोली पाहिजे असं त्याचं मत होतं.

काही लोकांच्या मते संश्लेषित बुद्धिमत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्तेची पुढची पायरी आहे. यावरचे वाद काहीही असले तरी संश्लेषित बुद्धिमत्तेची प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्तेला वगळून होणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेतली नैसर्गिक भाषा संवर्धन, न्यूरल नेटवर्क, यंत्र अध्ययन, सखोल अध्ययन अशासारखी काही साधनं वापरूनच संश्लेषित बुद्धिमत्ता शक्य होईल हे मात्र नक्की.

माधवी ठाकूरदेसाई

Story img Loader