माणसासारखा दिसणारा ह्युमनॉइड बनवण्यात जपानी लोक सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. १९७० च्या दशकात दोन पायांवर चालू शकणारा आणि काही जपानी शब्द उच्चारणारा पहिला ह्युमनॉइड जपानी संशोधकांनी विकसित केला. त्याला ‘वबॉट-१’ असे नाव दिले गेले. वबॉट-१ला दृष्टी होती, त्याला एखादी वस्तू इकडून तिकडे ठेवता येत असे. त्या काळात तंत्रज्ञान आजच्याइतके पुढारलेले नसल्यामुळे पुढे दहा वर्षांनी वबॉट-२ हा ह्युमनॉइड विकसित केला गेला. या ह्युमनॉइडला चक्क पियानो वाजवता येत असे. कालांतराने होंडा या कंपनीने पी-२, पी-३, पी-४ असे एकापेक्षा एक वरचढ ह्युमनॉइड्स विकसित केले. त्यांना माणसांसारखेच चालता येते हे बघून सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेतल्या प्रगतीमुळे ह्युमनॉइड्सना एखाद्या वेळेस विचार करता येईल; पण माणसांसारखे चालता येणे फार कठीण जाईल असेच वाटत होते. सुरुवातीचे ह्युमनॉइड्स विद्यापीठात बनवले गेल्यामुळे काहीसे ओबडधोबड होते. पण होंडा कंपनीने अतिशय व्यावसायिक पद्धतीने ह्युमनॉइड्स बनवल्यामुळे या शास्त्रात क्रांती होऊन एकापेक्षा एक सरस असे ह्युमनॉइड्स जगभरात तयार केले जाऊ लागले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा